एरंडाच्या बिया खाल्ल्याने चौदा मुलांना विषबाधा होण्याचा प्रकार काल शनिवारी सायंकाळी महाडमधील दासगाव आदिवासी वाडी येथे घडला. या सर्वांवर दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

दासगाव येथील आदिवासीवाडीवरील गणेश जाधव (४), अमोल हिलम (१२), प्रेम हिलम (७), ज्ञानेश्वर जाधव (वय ८), पार्वती जाधव (१२), शिरिष जाधव (१४), वैदेही हिलम (५), अमित पवार (५), गंगी हिलम (१२), निर्मला पवार (८), सोनू हिलम (१०), चांदणी हिलम (१०), प्रियांका हिलम (१२), सखाराम जाधव (१२) या १४ मुलांना काल रात्री या उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. तातडीने या मुलांना दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याचे स्पष्ट झाले.

दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आफरीन खतीब यांनी त्यांच्यावर उपचार केले. या मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना महाड येथे नेणे शक्य नव्हते. त्यामुळे डॉ. आफरीन यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर जगताप यांचे फोनवरून मार्गदर्शन घेत या सर्व रुग्णांवर यशस्वी उपचार केले. सर्व रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.