लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : शहरात रुग्ण वाढीचे सत्र कायम आहे. १४ नवीन रुग्णांची शुक्रवारी भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ७२६ वर पोहोचली. आतापर्यंत ३४ जणांचे मृत्यू झाले आहेत. सध्या १८७ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला शहरात वेगवेगळ्या भागात रुग्ण आढळून येत आहेत. आज आणखी १४ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण ८९ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ७५ अहवाल नकारात्मक, तर १४ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. एकूण रुग्ण संख्या तब्बल ७२६ झाली. आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एकाने आत्महत्या केली. आज सकाळच्या अहवालानुसार १४ नवे करोनाबाधित आढळून आले. त्या रुग्णांमध्ये पुरुष व महिला प्रत्येकी सात आहेत.

यामध्ये गुलजारपूरा, सिंधी कॅम्प, हैदरपूरा येथील प्रत्येकी दोन, तर गोरक्षण रोड, गवळीपूरा, पातूर, बिर्ला कॉलनी, अकोट फैल, बैदपुरा, जुने शहर, मोहता मिल येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार एकही सकारात्मक रुग्ण आढळून आला नाही. ६१ अहवाल नकारात्मक आले. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्यात येत आहेत. शहरात प्रत्येकाची आरोग्य तपासणीच्या मोहिमेनी वेग घेतला असून, विविध भागातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. अकोल्यातील मृत्यूच्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आता वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.

‘डिस्चार्ज’च्या संख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला

अकोला जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असली तरी उपचाराअंती करोनावर मात करणाºयांचीही संख्या मोठी आहे. रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ मिळालेल्यांच्या संख्येने आज पाचशेचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत ५०५ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी सोडलेल्या १७ जणांचाही समावेश आहे. त्यातील सात जणांना घरी, तर १० जणांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवण्यात आले. अकोल्यात करोनावर मात करणाºयांचे प्रमाण ६९.५५ टक्के आहे.
आतापर्यंत ५१०९ नमुने नकारात्मक
अकोला शहरासह जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नकारात्मक अहवाल येण्याचे प्रमाणही मोठे आहे. आतापर्यंत एकूण ५८३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात नकारात्मक अहवालांची अहवालांची एकूण संख्या ५१०९, तर सकारात्मक अहवाल आलेल्या एकूण रुग्णांची ७२६ आहे. अकोल्यात विषाणू संशोधन व तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यापासून नमुन्यांच्या चाचणीचे प्रमाण चांगलेच वाढले. त्यामुळे निदान लवकर होत आहे.
आमदार शर्मांकडून परिस्थितीचा आढावा
आमदार गोवर्धन शर्मा यांनी आज प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी करून करोनाची बाधा झालेल्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या. भानपुरा, गुलजारपुरा, सावंतवाडी, रणपिसे नगर, साई नगर, डाबकी रोड, अकोट फैल, माळीपूरा, गायत्री नगर, विठ्ठल मंदिर परिसर, जवाहर नगर, बैदपुरा या भागांमध्ये जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस व अधिकाºयांसोबत पाहणी करून त्यांनी आरोग्य सेवा व स्वच्छतेबाबत निर्देश दिले.