महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे. १४ रुग्ण मुंबईत तर १ रुग्ण बुलढाण्यात पॉझिटिव्ह आढळल्याने ३२० वरुन रुग्ण संख्या थेट ३३५ वर गेली आहे. करोनाशी लढा देता यावा म्हणून महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अशात रुग्णसंख्या चांगलीच वाढते आहे ही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. देशातली करोनाग्रस्तांची संख्या १६०० च्या वर गेली आहे. यामधले सर्वाधिक ३३५ रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. बुलढाण्यात आणखी एक करोनाग्रस्त पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. मुंबईत काल दिवसभरात ५९ रुग्ण आढळले होते. आज १४ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. सकाळपर्यंत ३२० वर असलेली संख्या आता ३३५ वर पोहचली आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

आज दुपारीच महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढते रुग्ण ही धोक्याची घंटा आहे असं त्यांनी म्हटलं होतं. लोकांनी काटेकोरपणे सगळे नियम पाळावेत नाहीतर लॉकडाउनचा काळ वाढवावा लागेल असंही पवार यांनी म्हटलं होतं.