वाघ, बिबट्या व इतर वन्यप्राण्यांना आकर्षित करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रिसॉर्टस् व फार्महाऊस मालक कॅमेरा ट्रॅप, कृत्रिम पाणवठे, तलाव, मचाण आदी उपक्रम राबवित असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. वन्यप्राण्यांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असलेले हे प्रकार राष्ट्रीय व्याघ्र
संवर्धन प्राधिकरणाचे या संदर्भातील निर्देश येईपर्यंत बंद ठेवावेत, अशी नोटीस ताडोबा बफरमधील १४ रिसोर्टस्ना देण्यात आली आहे. दरम्यान, होम स्टे व खासगी फार्म हाऊसमध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील तळोधी नाईक येथे मानद वन्यजीव रक्षक पूनम धनवटे यांची शेती आहे. त्यांच्या शेतात कृत्रिम पाणवठा तयार करण्यात आला असून, कॅमेरा ट्रॅप व चितळाचे संशयास्पद शिकार प्रकरण समोर आले. यानंतर वनखात्याने या संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेतला. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात हजारो देशीविदेशी पर्यटक व्याघ्र भ्रमंतीसाठी आल्यावर ताडोबातील बफर क्षेत्रातील रिसॉर्टस् व फार्महाऊस, गावातील होम स्टे व शेतात मुक्काम करतात. त्यांना वाघ, बिबटय़ासह अन्य वन्यप्राणी दिसावे म्हणून कॅमेरा ट्रॅप, कृत्रिम पाणवठे, तलाव, मचाणींव्दारे आकर्षित करतात. बरेचदा वाघांना आकर्षित करण्यासाठी गाय, बकरा किंवा चितळाचे मटणही जंगल परिसरात टाकण्यात येते. या वासाने ते शेत किंवा फार्महाऊसजवळ येतात तेव्हा रिसोर्टस्, होम स्टे व शेतमालक पर्यटकांना व्याघ्रदर्शन घडवतात. विशेष म्हणजे वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यावसायिकांकडून हे प्रकार मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. प्राण्यांना धोकादायक असलेला हा उपक्रम तात्काळ बंद करावा, अशी नोटीस १४ रिसोर्टस् मालकांना ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने यांनी बजावली असून, उर्वरीत खासगी शेतीमालक, होम स्टे व गावांमध्ये अशा पध्दतीने काम करणाऱ्यांची यादी तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतात तलाव व कृत्रिम पाणवठा तयार केल्यावर तेथेच कॅमेरा ट्रॅप लावायचे आणि वाघांची छायाचित्रे घ्यायची, अशीही अनधिकृत कामे  सुरू आहे. मात्र, या संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे काही निर्देश किंवा नियम नाहीत. त्यामुळे वाघांना आकर्षित करण्याचा हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे वनाधिकाऱ्यांचे मत आहे. उपवनसंरक्षक नरवने यांनी एनटीसीएला पत्र लिहून या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे तयार करून रिसॉर्टस् व फार्म हाऊस मालकांना असे करण्यास बंदी घालावी, अशीही मागणी लावून धरली आहे.

पूनम धनवटे यांना क्लिन चिट
जंगलातून साधे बांबू घेऊन येणाऱ्या किंवा खासगी होम स्टे व रिसॉर्टस् मालकांना वारंवार नोटीस देणाऱ्या वनखात्याने तळोधी नाईक येथे चितळाची शिकार, कॅमेरा ट्रॅप व फासे प्रकरणात मानद वन्यजीव रक्षक पूनम धनवटे यांना क्लिन चिट दिली आहे. या प्रकरणी चौकशी केली असता वनखात्याला माहिती उशिरा कळविण्याशिवाय धनवटे यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून आलेला नाही, तसेच शेतात तलाव, कृत्रिम पाणवठा व कॅमेरा ट्रॅप लावण्यासंदर्भात एनटीसीएच्या कुठलेही निर्देश नसल्यामुळेच क्लिन चिट दिल्याचे नरवने यांनी सांगितले.