जिल्ह्यातील अंगणवाडय़ा सर्वासाठी पथदर्शक ठराव्यात, तेथे लहान मुलांचे संगोपन उत्कृष्ट व्हावे, या साठी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून सुरुवातीला जिल्ह्यातील १४० अंगणवाडय़ांची निवड केली असून, त्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळावे, या साठीची तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रत्येक अंगणवाडीस भेट देऊन या कामी अधिकाधिक लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ६६३ अंगणवाडय़ा, तर १९९ मिनी अंगणवाडय़ा कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ६०५ गावे, वस्त्यांवरील अंगणवाडय़ांना या योजनेचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात सध्या भूम १५४ (मिनी अंगणवाडय़ा २२), कळंब २१९ (२९), उस्मानाबाद १८० (१७), तुळजापूर २११ (२९), उमरगा १७६ (१०), परंडा १४६ (३२), लोहारा १४२ (१४), वाशी ११७ (१६), मुरुम १४७ (१६) व तेर १७१ (१४) अशी अंगणवाडय़ा, मिनी अंगणवाडय़ांची संख्या आहे.  
या अंगणवाडय़ांमधून गरोदर व स्तनदा माता, शून्य ते ६ वयोगटातील बालकांना पूरक पोषणआहाराची सुविधा देण्यात येते. शिवाय किशोरवयीन मुलींसाठी योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील ९७ हजार ९८९ बालके, १८ हजार ९२४ गरोदर व स्तनदा माता, तसेच ४ हजार ४८८ किशोरवयीन मुलींनी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतला. प्रत्येक अंगणवाडय़ांमध्ये माता बाल संरक्षण कार्ड तयार करण्यात आले. प्रत्येक बालकाची नियमित आरोग्य तपासणी, त्यांचे नियमित लसीकरण याकडेही लक्ष देण्यात येत आहे.
मात्र, ही नियमितता कायम राहावी, या साठी आता प्रयत्न होत आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी सर्व बालविकास अधिकाऱ्यांची या संदर्भात बठक घेऊन आयएसओ प्रमाणपत्र मिळण्यासाठीची सर्व कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. के. नवले यांनी सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रत्येक अंगणवाडीस भेट देऊन गावकऱ्यांचे सहकार्य घेऊन व त्यांना याचे महत्व पटवून देत अधिकाधिक सहकार्य करण्यास प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.