शाळाप्रवेशाच्या वेळी लावलेल्या १ जून या जन्मतारखेचा परिणाम!
सोलापूर जिल्हा परिषदेतील तब्बल १४१ कर्मचारी मंगळवारी, ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. यात सर्वाधिक ८९ कर्मचारी प्राथमिक शिक्षण विभागातील आहेत. शाळांमध्ये गुरुजींनी १ जून ही जन्मतारीख लावल्यामुळे त्यातून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात हे कर्मचारी सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सामान्य प्रशासन विभागातील १६, आरोग्य विभागातील १४, बांधकाम विभागातील ११, ग्रामपंचायत विभागातील ५, अर्थ विभागातील ३, महिला व बालकल्याण विभागातील २ याप्रमाणे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या सर्वाना जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला.
बालपणी शाळेत नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांची नेमकी जन्मतारीख माहीत नसल्यामुळे शाळांतील गुरूजीच शाळा सुरू झाल्याच्या दिवशीची म्हणजे १ जून रोजीची जन्मतारीख निश्चित करीत. त्यानुसार जन्मदाखले तयार केले जात. अशा प्रकारे १ जून रोजी जन्मतारीख असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. सेवापुस्तिकांवर जन्मतारीख म्हणून १ जूनचीच नोंद झाल्यामुळे आपसूकच असे कर्मचारी ३१ मे रोजी वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त होतात.
ही संख्या मोठी असल्यामुळे दरवर्षी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणात निरोप दिला जातो.