करोनामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र असून, रुग्णसंख्या वाढीचा आलेख कायम आहे. मात्र, दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे करोना मात करून घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज दिवसभरात राज्यात ११ हजार १५ जणांना करोनाची लागण झाल्याचं निप्षन्न झालं. तर १४ हजार २१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

राज्यातील करोना रुग्णांची आकडेवारीची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. “राज्यात आज ११ हजार १५ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली. आज नवीन १४ हजार २१९ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५ लाख २ हजार ४९० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १ लाख ६८ हजार १२६ रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.४७ टक्के झालं आहे” , असं टोपे यांनी सांगितलं.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ नमुन्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९२ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.

मुंबईत आतापर्यंत ७ हजार रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज दिवसभरात ७४३ रुग्णांची भर पडली. तर १ हजार २५ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील एकूण करोना रुग्णसंख्या १ लाख ३७ हजार ९१ इतकी झाली आहे. यात १८ हजार २६३ रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, १ लाख ११ हजार ८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत दिवसभरात २० जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत ७ हजार ४३९ जणांचा मृत्यू झाला आहे. बृह्नमुंबई महापालिकेनं ही माहिती दिली.