रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित रूग्ण शोधण्यासाठी अ‍ॅन्टीजेन चाचण्या सुरू केल्यामुळे एकाच दिवसात तब्बल १४५ सकारात्मक रूग्ण सापडल्याचा विक्रम झाला आहे. अर्थात यामध्ये नेहमीप्रमाणे रत्नागिरी आणि चिपळूण हे दोन तालुके आघाडीवर आहेत.

गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या १४५ करोनाबाधित रूग्णांपैकी तब्बल १३७ जण या अ‍ॅन्टीजेन चाचणीद्वारे निष्पन्न झाले आहेत. त्यापैकीही १२९ जण फक्त  रत्नागिरी (७४) आणि चिपळूण (५५) या दोन तालुक्यांमधील आहेत.

याचबरोबर, जिल्ह्यात एका दिवसात ६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, त्याचबरोबर, दोन हजारांहून जास्त रूग्णांनी या रोगावर मात केली आहे.

जिल्ह्यात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी यापूर्वी आढळून आलेल्या करोनाबाधितांच्या निकटच्या सहवासातील व्यक्ती शोधून तपासण्याची जोरदार मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. अशा संशयित रूग्णांच्या आरटी—पीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन अलिकडेच जिल्ह्यात अ‍ॅन्टीजेन चाचण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. या दोन्हीमुळे करोनाबाधित रूग्ण सापडल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

या रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या सहाजणांपैकी  रत्नागिरीतील ३२ वर्षांचा तरूण आणि ५५ वर्षांचा प्रौढ, चिपळूण तालुक्यातील तरूण (वय ३८ वर्षे) व वयस्क पुरूष (६५), दापोली येथील वृध्द  स्त्री  (७०), तर संगमेश्वर येथील वृध्द पुरुष रूग्ण (६२ वर्षे) आहे. त्यामुळे एकुण मृतांची संख्या ११८ झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मृत रत्नागिरी तालुक्यातील आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पाठोपाठ चिपळूण २२ आणि दापोली २१ असा मृतांचा आकडा आहे.

सिंधुदुर्गात ७९ रुग्णांचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखीन ७९ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे श्री गणेश चतुर्थी सणावर करोना महामारीचे सावट आहे.

आजपर्यंत एकूण ८०२ करोनाबाधीत आढळले आहेत. तर ४८४  बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्य्स्थितीत जिल्ह्यात ३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी दिली.