गारपिटीमुळे बाधित झालेल्या नगर जिल्ह्यातील एकूण ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना १४८ कोटी रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. या मदतीचा लाभ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मिळावा यासाठी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तालुकानिहाय आढावा घेण्यास प्रारंभ केला आहे.
मार्च, एप्रिल महिन्यात गारपिटीचा मोठा फटका राज्यासह जिल्ह्यालाही बसला. बहुतेक तालुक्यांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे एकूण ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा, टरबूज, टोमॅटो आदी पिकांचे त्यात मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश विखे यांनी दिले दिले होते.
कृषी विभागाने पंचनामे करून सादर केलेल्या नुकसानीच्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य शासनाच्या निकषानुसार सुमारे १४८ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. बहुतेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना ही मदत मिळण्यास प्रारंभ झाला असून, मदतीबाबत काही ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन विखे यांनी त्याची माहिती घेतली आहे.
तालुक्यात १० कोटींची भरपाई
राहाता तालुक्यात गारपिटीने बाधित झालेल्या ५३ गावांमधील १० हजार ११२ शेतकऱ्यांना सुमारे ९ कोटी ६९ लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. त्यासाठी विखे यांचा पाठपुरावा सुरू होता.