कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १४व्या संमेलनाला आज दापोली येथे शानदार प्रारंभ झाला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी मावळते अध्यक्ष दिनकर गांगल यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे घेतली. आपल्या अध्यक्षीय भाषणात नायगावकर यांनी आधुनिक काळातील बदलते तंत्रज्ञान, प्रसार माध्यमांचा रेटा आणि बदलत्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीमुळे वाचन संस्कृतीचा संकोच होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज व्यक्त केली.
या साहित्य संमेलनाचा शुभारंभ माजी न्यायमूर्ती भास्कर शेटय़े व अरुण नेरुरकर यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीच्या उद्घाटनाने झाला. दिंडी सानेगुरुजी उद्यानातील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करून संमेलनस्थळापर्यंत काढण्यात आली. यानंतर लोकमान्य टिळक ग्रंथदालनाचे उद्घाटन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे, तर रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा विनिता शिगवण यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष  डॉ. महेश केळूसकर यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक व मावळते अध्यक्ष दिनकर गांगल यांनी या प्रसंगी मनोगते व्यक्त केली