\ विरारच्या विजयवल्लभ या खासगी रुग्णालयात शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत अतिदक्षता विभागातील १५ करोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे. अतिदक्षता विभागातील वातानुकूलन यंत्रणेत शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. अतिदक्षता विभागातील अन्य तीन रुग्णांना वाचविण्यात यश आले असून त्यांना अन्य खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

या आगीप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात रुग्णालयाच्या व्यवस्थापक आणि डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

विरार पश्चिमेच्या बोळींज येथे विजयवल्लभ हे चारमजली रुग्णालय आहे. या रुग्णालयात एकूण ८५ करोना रुग्ण उपचार घेत होते. रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर सर्वसाधारण विभाग,  दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभाग, तर तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर विशेष कक्ष तयार करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. याच विभागात मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणा बसविण्यात आली होती. शुक्रवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास वातानुकूलन यंत्रणेला आग लागली. धुराचे लोट येऊ लागले. काही वेळातच वातानुकूलन यंत्रणेत स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळा अतिदक्षता विभागात पसरल्या. पालिकेच्या अग्निशमन विभागाने अध्र्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत  ५ महिला आणि ९ पुरूष रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी इतर ४ रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवले. त्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर संध्याकाळी उशिरा आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. अन्य ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ‘विजयवल्लभ’मध्ये इतर विभागांत दाखल रुग्णांनाही पालिकेच्या आणि अन्य खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, आमदार हितेंद्र ठाकूर, खासदार राजेंद्र गावित, प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार उज्वला भगत यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.

रुग्णालयातील आगीवर वेळीच नियंत्रण मिळवून इतर सर्व रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने अधिक जिवितहानी टळल्याचे पालिकेचे आयुक्त डी. गंगाधरन यांनी सांगितले. विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते किरिट सोमय्या यांनी रुग्णालयाला भेट देऊन अनागोंदी कारभाराचा आरोप केला.

नातेवाईकांचा आक्रोश

अतिदक्षता रुग्णालयात १७ करोनाबाधितांवर उपचार सुरू होते. त्यातील अनेक जण हे बरे होऊ लागले होते आणि त्यांना सर्वसाधारण विभागात हलविण्यात येणार होते. मात्र तेथे  खाटा नसल्याने त्यांना हलविण्यात आले नव्हते, असे आगीत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. आगीत मृत्यू झालेल्यांचे मृतदेह विरार नगर येथील स्मशानभूमीत ठेवण्यात आले होते. काही मृतदेह पूर्णत: होरपळल्याने त्यांची ओळख पटविणे नातेवाईकांना शक्य होत नव्हते. मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता. स्मशानभूमीत जाण्यासाठी त्यांच्याकडे पीपीई संचदेखील नव्हते. अनेक नातेवाईक रस्त्यातच धाय मोकलून रडताना दिसत होते.

पालिका, सरकारची मदत जाहीर

या आगीत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना वसई विरार महापालिकेने ५ लाख रुपये, राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख, जखमींना १ लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पतीच्या मृत्युवार्तेने महिलेचा मृत्यू

विजयवल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत कुमार दोशी (४५) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्यांच्या पत्नीचेही हृदयविकाराच्या धक्क््याने निधन झाले. वसई पश्चिमेकडील शंभर फुटी रोड परिसरात दोशी कुटुंबीय राहत होते. यात कुमार किशोर दोशी (४५) आणि त्यांच्या पत्नी चांदणी दोशी यांना काही दिवसांपू्र्वी कोरोनाची लागण झाली होती. कुमार यांच्यावर विजय वल्लभ रुग्णालयात तर चांदणी यांच्यावर विरार मधील जीवदानी रुग्णालयात उपचार सुरु होते.