लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलढाणा जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ७ ते २१ जुलैपर्यंत १५ दिवसांची संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात यापूर्वीच १५ जुलैपर्यंत प्रशासनाने संपूर्ण टाळेबंदीचे आदेश लागू केले आहेत.

त्यानंतर त्या तालुक्यांमध्येही २१ जुलैपर्यंत टाळेबंदीचे एकत्रित आदेश लागू होणार आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा असणार आहे. तसेच दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत अत्यंत कडक संचारबंदी लागू असणार आहे. मलकापूर उपविभाग १५ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने व त्यानंतर नियोजित वेळेत सर्व प्रकारची दुकाने उघडता येतील. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या नागरिकांना टाळेबंदीच्या कालावधीत प्रशासनाकडून ओळखपत्र वितरीत करण्यात येतील. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही, असे ते म्हणाले. या काळात दुचाकीवर एक, चार व तीन चाकी वाहनांमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना परवानगी राहील. सर्वांनी चेहऱ्यावर मुखपट्टी किंवा स्वच्छ रूमाल वापरावा. चेहºयावर काही बांधलेले नसल्यास दंड आकारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बुलढाणा येथे करोना तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. याचा सुमारे दीड कोटींचा खर्च अपेक्षित असून, डॉक्टरसह १० जणांचे मनुष्यबळ लागेल. जिल्ह्यातील नमुने तपासणीसाठी अकोला, यवतमाळ व नागपूर येथे पाठविण्यात येत आहेत. पुढील काळात जालना येथे तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येत असून याठिकाणी तपासणी करण्यात येतील. त्यामुळे नमुन्यांचे निदान लवकर होईल. जलद तपासणीसाठी दोन हजार ‘रॅपिड टेस्ट कीट’ जिल्ह्याला मिळाल्या आहेत. या माध्यमातून ३० मिनिटात निदान होईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात समन्वय राखत करोनाला नियंत्रित ठेवण्यात बºयापैकी यश आले आहे, असे सांगून त्यांनी प्रशासनाची पाठराखण केली. यावेळी आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील उपस्थित होते.

आज एकही रुग्ण आढळला नाही
बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. ३१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. ते सर्व नकारात्मक आले आहेत. दरम्यान, १४ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.