गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा भीषण हल्ला; वाहनचालकाचाही मृत्यू

रवींद्र जुनारकर, कुरखेडा

राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडाजवळ बुधवारी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात शीघ्रकृती पथकाचे (क्यूआरटी) १५ जवान शहीद झाले. जवानांना घेऊन जाणाऱ्या खासगी गाडीचा चालकही या हल्ल्यात मृत्युमुखी पडला.

नक्षलवाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या ३६ वाहनांची जाळपोळ केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर सकाळी ११ वाजता कुरखेडा येथून शीघ्रकृती पथक घटनास्थळाच्या दिशेने निघाले असता जांभुळखेडा-लेंडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात हे जवान शहीद झाले.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून या भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. गट्टा मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. त्यानंतर पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र केली. गुंडुरवाही-फुलणार गावादरम्यानच्या जंगलात नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्यात १६ लाखांचे बक्षीस असलेली नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीची सदस्य तथा गट्टा दलम कमांडर रामको ऊर्फ कमला मनकु नरोटे आणि शिल्पा ऊर्फ कोटे ऊर्फ मनू दसरू दुर्वा या दोन जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाला यश आले होते. लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीत भरघोस मतदान झाले होते. यामुळे नक्षलवाद्यांनी २२ ते २८ एप्रिलदरम्यान बंदचे आवाहन केले होते. मात्र, त्यास स्थानिकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने नक्षलवादी बिथरले होते. त्यामुळे आपले वर्चस्व दाखवून देण्याबरोबरच गेल्या वर्षी कसनासूर-बोरीयाच्या जंगलात पोलिसांनी ४० नक्षलवाद्यांना ठार केल्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जाते.

 शहीद जवान

पोलीस शिपाई साहुदास बाजीराव मडावी, प्रमोद महादेव भोयर, राजू नारायण गायकवाड, किशोर यशवंत बोबाटे, संतोष देविदास चव्हाण, सर्जेराव एकनाथ खर्डे, दयानंद ताम्रध्वज शहारे, भूपेश पांडुरंग वालोदे, आरिफ तौशिब शेख, योगाजी सीताराम हलामी, पुरणशहा प्रतापशाह दुगा, लक्ष्मण केशव कोडापे, अमृत प्रभुदास भदाडे, अग्रमान बक्षी रहाटे, नितीन तिलकचंद घोडमोरे या १५ हे जवान शहीद झाले. तर दादुभाऊ सिंगनाथ असे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

२००९ नंतरची मोठी घटना

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत २००९ मध्ये तीन वेळा भूसुरुंग स्फोट केले होते. त्यात फेब्रुवारी महिन्यात धानोरा तालुक्यात भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांनी २१ मे रोजी हत्तीगोटा येथे शक्तिशाली भूसुरुंग स्फोट केला होता. त्यात १६ पोलीस जवान शहीद झाले होते. त्यानंतर याच वर्षी ८ ऑक्टोबर रोजी नक्षलवाद्यांनी पुन्हा एक भूसुरुंगस्फोट लाहेरी येथे घडवून आणला होता. त्यात १७ पोलीस जवान शहीद झाले होते.  या तीन घटनांनंतर नक्षलवाद्यांना अशा प्रकारची मोठी कारवाई करता आली नव्हती. विशेष म्हणजे पोलिसांनीही विशेष अभियान राबविताना सतर्कता बाळगत नक्षलवाद्यांना लक्ष्य केले होते. त्याचाच परिणाम गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी कसनासूर-बोरियाच्या जंगलात पोलिसांना ४० नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले होते. तेव्हापासून पोलिसांचा आत्मविश्वाससुद्धा बळावला होता. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डोके वर काढले. त्याचाच परिणाम आज पोलिसांच्या छोटय़ा चुकीमुळे १५ पोलीस जवान शहीद झाले.

२० वर्षांत १२ हजार बळी

केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात १९९८ ते जुलै २०१८ या २० वर्षांच्या कालावधीत नक्षलवादी हल्ल्यांमध्ये १२ हजारांहून नागरिकांचा बळी गेला. त्यात पोलीस आणि सुरक्षा दलाचे २७०० कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. नक्षलवादी यंत्रणा १० राज्यांतील ६८ जिल्ह्य़ांमध्ये सक्रिय असून त्यांच्या ९० टक्के कारवाया ३५ जिल्ह्य़ांमध्ये झाल्या आहेत.

खासगी वाहनाचा वापर घातक ठरला..

सुमारे १५० नक्षलवाद्यांनी दादापूर येथे कंत्राटदाराची ३६ वाहने जाळल्याची माहिती मिळताच कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे घटनास्थळी दोन गाडय़ांसह दाखल झाले. तेथून त्यांनी या पथकाला तातडीने घटनास्थळी बोलावले. मात्र, पोलिसांना वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने या, अशी सूचना काळे यांनी पथकाला केली. काळे यांच्याकडून पथकाला सूचना दिल्या जात असताना बाजूला नक्षली खबरे हजर होते, असे सांगण्यात येते. त्यांनी हे पथक घटनास्थळाच्या दिशेने येणार असल्याची माहिती नक्षलींपर्यंत पोहोचवली. दरम्यान हे पथक टाटा एस या खासगी वाहनातून घटनास्थळाकडे निघाले. पथक दादापूर येथे पोहोचण्यापूर्वीच जांभुळखेडा-लेंडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी हा भूसुरुंग स्फोट घडवला.

लोकशाहीविरोधी शक्तींना नेस्तनाबूत करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी मुकाबला करू. या कठीणप्रसंगी आम्हा सर्वाच्या संवेदना ‘क्यूआरटी’च्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री