राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजापात प्रवेश केल्यानंतरही आपण आपल्या भूमिकांवर ठाम राहणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय इतके वर्षे राष्ट्रावादीत राहून जनतेची काहीच कामे करता आली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच अनेकांनी मला निवडणुकीत पाडण्यासाठी प्रयत्न केले असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी भाजपा प्रवेशाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रावादीच्या गोटातून त्यांच्यावर टीका केल्या जात आहे. या टीकाकारांचाही उदयनराजेंनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपा प्रवेश का केला नाही? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, एक एक शेवटची संधी देऊन बघावी असं मला तेव्हा वाटलं होतं. पहिल्या, दुसऱ्या निवडणुकीत जे मताधिक्यं मिळालं होतं, वाटलं होतं यंदा त्यापेक्षा जास्त मताधिक्यं मिळेल. पण मताधिक्यं लांबच राहिलं मात्र घसरण एवढी झाली की, नैतिकदृष्ट्या जर मला विचारलं तर निवडून जरी आलो असलो तरीपण मी हे समजतो की हा माझा पराभवचं झाला आहे. मग अशा लोकांबरोबर दिवस काढायचे तरी किती? प्रत्येकवेळी तेच अनुभव, आयुष्याचे १५ वर्षे म्हणजे थोडा काळ नाही.

सत्तेत असतानाही त्यांनी काही केलं नाही, मात्र तरी देखील मी सोबत होतो. मात्र माझा पराभव होईल यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नव्हते. मला खोटं कधीच सहन होत नाही, लोकांच्या हिता विरोधात काही होतं असेल आणि प्रगतीच्या आड जर कोणी येत असेल, तर मी उघडपणे माझं मत व्यक्त करतो. हा माझा स्वभाव आहे आणि मग तो कुणाला आवडो अथवा न आवडो याचं मला काहीही देणंघेणं नाही असे स्पष्टपणे सांगत, यावेळी त्यांनी इतक्या वर्षांमध्ये माझं एकही काम झालं नसल्याचं बोलून दाखवलं.

राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवारांबाबत बोलताना ते म्हणाले की, या सर्व तक्रारी त्यांच्या कानावरीही अनेकदा घातल्या आहेत. त्यांचा मी वैयक्तिक आदरही करतो, माझे त्यांचे संबंधही चांगले आहेत. पण शेवटी जनतेला उत्तर द्यायची आहेत. जनता ही विकासाच्या बाजूनेच कौल देणार आहे, त्यामुळे जनतेला मला काय केलं हेच दाखवावं लागणार असे त्यांनी सांगितलं. तसेच, सोशल मिडीयावरील चर्चांना मी फारसे गांभिर्याने घेत नाही, मी जे केलं ते माझ्या विचाराने केलं असेही ते यावेळी म्हणाले.