नागझरी वसावलापाडा, उधवा बोंडपाडा, कासा वळवीपाडा येथील ऑनलाइन शिक्षणाचाही खोळंबा

डहाणू : डहाणू शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर नागझरी येथील बोंडपाडा, वसावलापाडा या भागांत  वीजवाहिनीअभावी ४५ कुटुंबे अजूनही अंधारात चाचपडत आहेत. पाडय़ात वीज लाइन पोहोचवून स्वतंत्र  ट्रान्सफॉर्मर बसवून या ४५ कुटुंबांना वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी येथील नागरिक वारंवार करीत आहेत.

महावितरणकडे पाठपुरावा केल्यानंतर काही दिवसांपूर्वी विजेचे खांब टाकले आहेत; परंतु महावितरणची वीज केव्हा पोहोचेल, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. तलासरी तालुक्यातील उधवा बेंडगाव येथे ९० कातकरी कुटुंबे तसेच कासा वळवीपाडा येथे २० कुटुंबे आजही विजेअभावी अंधारात जीवन जगत आहेत. यातच ऑनलाईन शिक्षणाचाही खोळंबा झाला आहे.

डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत नागझरीमधील बोंडपाडा व वसावलापाडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून वीज पोहोचली नसल्याने येथील ४५ आदिवासी कुटुंबे अंधारात आपले जीवन जगत आहेत. दरम्यान, या पाडय़ातील ४५ आदिवासी कुटुंबांनी अनेक वेळा वीज पाडय़ामध्ये मिळावी यासाठी महावितरण कार्यालयात अर्ज करत होते; परंतु तेथे कोणीही दखल घेत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

तवा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष वझे यांना ग्रामस्थांनी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पुढाकार घेत महावितरण अधिकाऱ्याशी बोलून या पाडय़ाला वीजपुरवठा करावा यासाठी प्रयत्न करून पाठपुरावा केला. आता अखेर दोन दिवसांपूर्वी या पाडय़ात विजेच्या तारांसाठी खांब उभे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच या आदिवासींच्या पाडय़ातील अंधार दूर होईल, असा ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.  दरम्यान सध्या सर्वच ठिकाणी शिक्षणासह सर्वच ऑनलाइन सेवा सुरू झाल्या आहेत. अनेक सरकारी योजना ऑनलाइनवरून राबविण्यात येत आहेत आणि या पाडय़ात वीज नसल्याने अनेक शासकीय योजनांसाठी गरीब आदिवासी कुटुंबांना वंचित राहावे लागत आहे.

या पाडय़ातील ४५ आदिवासी कुटुंबांना वीजपुरवठा अजूनही नाही, हे कळल्यावर महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून अनेक दिवस याबद्दल पाठपुरावा केला. त्यामुळे विजेचे पोल उभे करण्यासाठी महावितरणने सुरुवात केली आहे.

– संतोष वझे, सामाजिक कार्यकर्ते, तवा

नागझरी येथे अनेक वर्षांपासून प्रयत्न करून आता कुठे वीज महावितरणने पोल टाकावयास सुरुवात केली आहे. वीज नसल्याने मोबाइल चार्जिगसाठी दुसऱ्या गावात जावे लागते.

– वसंत वसावला, ग्रामस्थ, नागझरी

उधवा बेंडगाव येथे ९० कातकरी कुटुंबे विजेअभावी अंधारात आहेत.

– संजय कुवरा, ग्रामस्थ, उधवा