जिल्ह्यात रविवारी वादळी वाऱ्यामुळे जवळपास १५० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला, तर परभणी शहराचा अध्र्यापेक्षा भाग अंधारात बुडाला. वादळी-वाऱ्यामुळे वीज कंपनीचे अंदाजे दोन ते अडीच कोटींचे नुकसान झाल्याची माहिती अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. दरम्यान, गंगाखेड, पाथरी तालुक्यांत सोमवारी पुन्हा गारपीट झाली. सायंकाळी या दोन्ही तालुक्यात पाऊस सुरूच होता.  
रविवारी दुपारी जिल्हाभर वादळी-वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. वादळी-वाऱ्यात विजेचे खांब पडले, तर अनेक ठिकाणी तारा तुटल्या. १५-२० ठिकाणी रोहित्रे उखडून जमिनीवर पडली. त्यामुळे पाथरी, परभणी, पालम, गंगाखेड तालुक्यांतील उपकेंद्रावरील गावांची वीज खंडित झाली. ताडकळस, वझूर, बाभळगाव, दैठणा आदी दीडशे गावांत रात्रभर अंधार होता. या दीडशे गावांपकी ५० गावांत सोमवारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यास वीज कंपनीला यश आले. उर्वरित ठिकाणी विजेचे खांब उभे करणे, तारा ओढणे आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
परभणी शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे अध्र्यापेक्षा अधिक भागात वीज खंडित झाली. काही भागात रात्रभर अंधार होता. सोमवारी दिवसभर बहुतांश भागात वीजपुरवठा सुरू झाला. मराठवाडा कृषी विद्यापीठात मोठी झाडे उन्मळून पडली. एका छताचे छप्पर उडाले. अनेक ठिकाणी कच्चे रस्ते वाहून गेल्याने ग्रामीण भागात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. काही ठिकाणी रस्ते खचले. एकूण नुकसानीचा नेमका आकडा अजून हाती आला नाही.
पूर्णा तालुक्यातील गारपीटग्रस्त गावांची पाहणी
पूर्णा तालुक्यातील ताडकळस, धानोरा व परिसरात गारपीट झालेल्या गावांना जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी भेट दिली. गारपिटीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बठकही झाली. तहसीलदार विद्या िशदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिवेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजेय चौधरी, उपायुक्त (मनपा) दीपक पुजारी, शहर अभियंता किशोर संद्री तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गारपीट बाधितांना मदतीच्या दृष्टीने तत्काळ पंचनामे करण्याबाबत आदेश या वेळी देण्यात आले.