१८६७मध्ये आजच्याच दिवशी विरार-बॅकबे दरम्यान पहिल्या रेल्वेची धाव

बोरीबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान देशातील पहिली रेल्वेगाडी धावल्यानंतर १४ वर्षांनी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली रेल्वेगाडी धावली. विरार ते बॅकबे या स्थानकांदरम्यान धावणारी ही ट्रेन शुक्रवारी १५२ वर्षांची होत आहे. या १५२ वर्षांत पश्चिम रेल्वेने मोठय़ा प्रमाणात प्रगती केली असून विरार-बोरिवली चौपदरीकरण, डहाणू-विरार लोकल, वातानुकूलित लोकल असे महत्त्वपूर्ण प्रगतीचे टप्पे गाठण्यात यश आले आहे.

१८५३मध्ये बोरीबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान देशातील पहिली रेल्वेगाडी धावली. त्यानंतर १४ वर्षांनी म्हणजेच १२ एप्रिल १८६७ रोजी पश्चिम रेल्वेवरील  विरार ते बॅकबे यादरम्यान ट्रेन धावली. बॅकबे हे स्थानक पश्चिम रेल्वे मार्गाचे मुख्य स्थानक चर्चगेट होण्यापूर्वी अस्तित्वात होते. येथूनच गाडय़ा सुटत होत्या. हे स्थानक चर्चगेट आणि मरिन लाइन्स यांमध्ये होते. त्यावेळी बॉम्बे बडोदा आणि सेंट्रल इंडिया या विभागांतर्फे संपूर्ण पश्चिम रेल्वेचे रुळ, स्टेशन, रेल्वेगाडय़ांचे काम करण्यात आले होते. पहिल्यांदा इलेक्ट्रिक ट्रेन १९२८मध्ये बोरिवलीपर्यंत धावली होती. त्यापूर्वी ट्रेन वाफेवर धावत होत्या. ३ मार्च १९६१ला ९ डब्यांची तर १९८६ला १२ डब्यांची ट्रेन सुरू झाली. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर २९०० हून अधिक गाडय़ांच्या फेऱ्या आहेत.

पहिली गाडी कशी?

* पहिली ट्रेन विरारहून सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटली होती आणि बॅकबेला सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटली.

*  त्यावेळी ही ट्रेन नीअल म्हणजे आताच नालासोपारा, बसिन म्हणजे वसई, पंजो म्हणजे पाणजू, बेरेव्ला म्हणजे बोरिवली, पहाडी म्हणजे गोरेगाव, अंदारू म्हणजे अंधेरी, सांताक्रुझ, बंडोरा म्हणजे वांद्रे, माहीम, दादुरे म्हणजे दादर आणि ग्रँट रोड इत्यादी स्थानकांवर गाडी थांबली होती.

* या रेल्वेगाडीसाठी १८६९ पासून प्रथम, द्वितीय, तृतीय दर्जाची तिकिटे मिळत. एक महिना आणि तीन महिन्याची तिकिटे म्हणजे पास मिळू लागले.

* प्रथम दर्जाचे तिकीट ७ पैसे, द्वितीय ३ पैसे आणि तृतीय १६ आणे एवढे होते.

* गाडीत महिलांसाठी विशेष बोगी होती, ही माहिती वेस्टर्न रेल्वेच्या संग्रहालयातून मिळाली.