करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये पाच पोलिसांना करोनामुळे जीव गमावावा लागला आहे. तर, आणखी १५९ पोलीस करोनाबाधित आढळले आहेत.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता २१ हजार ३११ वर पोहचली आहे. यामध्ये करोनामुक्त झालेले १७ हजार ४३४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २२२ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील एकूण २१ हजार ३११ करोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार ३२६ अधिकारी व १८ हजार ९८५ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार ६५५ पोलिसांमध्ये ४५५ अधिकारी व ३ हजार २०० कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या १७ हजार ४३४ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ८४८ व १५ हजार ५८६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या २२२ पोलिसांमध्ये २३ अधिकारी व १९९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे.