जादूटोणाविरोधी वटहुकूमातंर्गत आतापर्यंत १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात सर्वाधिक चार गुन्हे नाशिक जिल्ह्यातील आहेत.
जादूटोणाविरोधात समाजात जागृती होत असल्याचे हे द्योतक असले तरी दक्षता अधिकाऱ्यांच्या नेमणुकीअभावी आठ ते १० प्रकरणांमध्ये या वहहुकूमातंर्गत कारवाई होऊ शकलेली नाही.
नागपूर विधीमंडळ अधिवेशनात जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर होण्याआधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याने २६ ऑगस्टपासून वटहुकूम लागू झाला. नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात त्याअंतर्गत पहिला गुन्हा एका तांत्रिकाविरूध्द नोंदविण्यात आला. असाध्य आजारावर जादूटोणाच्या नावाखाली उपचार करणाऱ्या उत्तर प्रदेशातील साहिलखान लियाकत आणि अमिरोद्दीन लतीफ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दुसऱ्या गुन्ह्याची नोंद नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. नरबळी देण्याच्या उद्देशाने मुलांना घरात खोदलेल्या खड्डय़ात बसवून पूजा सुरू असतानाच पोलिसांनी संगीता भालेराव, सुनीता भालेराव, रितेश भालेराव, विजय भालेराव यांना अटक केली होती. भूत उतरविण्याच्या नावाखाली  कर्नाटकमधील कोंडीबा महाराजविरोधात सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकांळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तर, अंगात अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या अकोला येथील इच्छाधारी महाराज उर्फ कैलास निचळविरोधात पोलिसांनी कारवाई केली.
पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मालेगाव येथील अश्पाक खानला अमळनेर येथील मायलेकींचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. भूत उतरविण्याच्या बहाण्याने अमानूष कृत्य करणाऱ्या बीड जिल्ह्यातील सुरडी येथील रमेश सपकाळविरोधात गेवराई पोलिसांनी कारवाई केली.१३ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव अहेर येथे जादूटोणा करीत असल्याचा संशय व्यक्त करीत महादेव भागडकर यांची हत्या करण्यात आली. ब्रम्हपुरी पोलिसांनी मारेकरी अतीश जवतळेविरोधात गुन्हा दाखल केला. अशा आणखी घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, वर्धा येथील सेवाग्राम, अहमदनगर जिल्ह्यातील बहिरवाडी, सोलापुरातील सोरेगाव, ठाणे जिल्ह्यातील वसई, पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटनांमध्येही वटहुकूमातंर्गत गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे.