गडचिरोली पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील बोरिया जंगलात रविवारी सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले. यात नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य व जहाल कमांडर साईनाथ ऊर्फ डोलेश मडी आत्राम (३५) व श्रीणू ऊर्फ श्रीकांत ऊर्फ रोवूथू विजेंद्र नरसिम्हा रामडू (३८) यांचा समावेश आहे. चकमकीत नक्षलवाद्यांच्या पेरीमिली दलमचे बहुतांश सदस्य ठार झाले आहेत. जिल्हय़ातील नक्षलवादी चळवळीच्या ३८ वर्षांच्या इतिहासातील पोलिसांची ही सर्वात मोठी यशस्वी कारवाई आहे.

गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने शनिवारी रात्रीपासून शोधमोहीम सुरू केली होती. रविवारी नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी चारही बाजूंनी घेरून गोळीबार केला. त्यात १६ नक्षलवादी ठार झाले. गोळीबार बंद झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या पाहणीत त्यांना नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले. यामध्ये विभागीय समितीचा सदस्य, साईनाथ ऊर्फ डोलेश मडी आत्राम व श्रीणू ऊर्फ श्रीकांत ऊर्फ रोवूथू विजेंद्र नरसिम्हा रामडू (३८) यांचाही समावेश होता. चकमकीत दोन महिला नक्षलवादीही ठार झाल्या आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

अशी झाली चकमक

साईबाबा व श्रीणूच्या नेतृत्वात बोरिया जंगलातील कसनापूर व  पेरीमिली गावानजीक मोठय़ा प्रमाणात नक्षलावादी तळ ठोकून बसले असल्याची माहिती सी-६० पथकाला मिळाली होती. या आधारावर पथकातील ६० ते ७० जवांनानी शनिवारी रात्रीपासूनच शोधमोहीम सुरू केली. रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास बोरिया जंगलात चकमक उडाली. सुमारे तीन ते साडेतीन तास ही चकमक सुरू होती. ठार झालेल्या साईनाथवर एकूण ८२, तर श्रीणू याच्यावर ६० गुन्हे दाखल आहेत. साईनाथ याच्यावर अहेरी, एटापल्ली व भामरागड या तीन तालुक्यांची जबाबदारी होती. तो याच भागात सक्रिय होता.

एके ४७ सह मोठा शस्त्रसाठा जप्त : घटनास्थळी एके ४७ सह मोठा शस्त्रसाठा, काडतुसे, नक्षली साहित्य, बॅटरी, वायर, पुस्तके, खाण्यापिण्याचे सामान, औषधे व इतर साहित्य सापडले. पोलिसांनी ते जप्त केले.

यापूर्वीच्या कारवाया

२०१३ मध्ये अहेरी तालुक्यातील गोविंदगाव येथे पोलिसांनी ६ नक्षलावाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर ६ डिसेंबर २०१७ रोजी सिरोंचा तालुक्यातील कल्लेड येथील जंगलात पोलिसांनी ९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे व गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कार्यकाळातच या दोन मोठय़ा कारवाया झाल्या आहेत.

गडचिरोलीच्या घनदाट जंगलातील चकमकीत एकापाठोपाठ एक नक्षलवादी मारले जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन नक्षलवाद्यांनी आता आत्मसमर्पण करावे. महाराष्ट्राची आत्मसमर्पण योजना ही देशात सर्वात चांगली आहे.     – अंकु श शिंदे, गोंदिया-गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक