सोलापुरात शनिवारी २० नवे करोनाबाधित रूग्ण आढळून आले. यात एका मृत महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत करोनाबाधित रूग्णांची संख्या २१६ वर पोहोचली असून मृतांची संख्यादेखील १४ वर पोहोचली आहे. करोनाबरोबर ‘साथी’चा फैलाव वाढल्यामुळे मृतांची संख्या वाढत असल्याचं म्हटलं जात आहे.

शनिवारी करोनाशी संबंधित १७५ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यानंतर त्यापैरी २० रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. २० रूग्णांमध्ये १२ पुरूष तर ८ महिलांचा समावेश आहे.

शहरातील अशोक चौकात राहणाऱ्या एका ४८ वर्षाच्या महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला गेल्या गुरूवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने त्याच दिवशी दुपारी तिचा मृत्यू झाला. तिचा करोना चाचणी अहवाल आज प्राप्त झाल्यानंतक त्यात करोना व सारीची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आज आढळून आलेल्या रूग्णांपैकी सहा रूग्ण शास्त्रीनगरातील आहेत. कुमठा नाका, नीलमनगर, एकतानगर येथे प्रत्येकी दोन रूग्णांची नोंद झाली. विजापूर रोडवरील मनोरमानगरात प्रथमच करोना बाधित रूग्ण सापडला आहे.