हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे सुमारे १६ हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत, तर उर्वरित पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

रायगड जिल्ह्यात दरवर्षी १ लाख ५ हजार हेक्टर भातपिकाची लागवड केली जाते. यावर्षी ९५ हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. जून आणि जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत यंदा कमी पाऊ स पडला होता. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दमदार पाऊस पडला होता. त्यामुळे भाताचे पीक जोमात आले होते. यंदा जिल्ह्यातील भाताचे उत्पादन वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना तसेच कृषी विभागाला होती. मात्र नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या आहेत. हातातोडांशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झाले आहे.

शेतात कापून ठेवलेले भाताचे पीक भिजले आहे, तर कापणीसाठी तयार असलेले पीकही शेतात आडवे झाले आहे. भाताचे दाणे भिजल्याने शेतकरी धास्तावले आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १६ हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभाग आणि महसूल विभागाने पीक परिस्थितीचे पंचनामे सुरू केले आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

उर्वरित पीक वाचविण्यासाठी कसरत

तयार झालेले परंतु पावसात वाचलेले भातपीक हातचे जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. वाचलेले भात वाळवून त्याची मळणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खणण्याची कामे हाती घेण्यात येत आहेत. या पाण्यामुळे भाताची काडी कमकुवत होत आहे. हळवी भातशेती तयार झाली असली तरी गरवी आणि निमगरवी पिके अजूनही तयार व्हायची आहेत. यावर उपाय म्हणून तयार भातपीक वाचवण्यासाठी शेतकरी शेतातून चर काढत आहेत. जमेल तशी कापणीही करत आहेत.

सलग तिसऱ्या वर्षी फटका

* जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान होण्याची ही पहिली वेळ नाही. सलग तीन वर्षे शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या तडाख्याला सामोर जावे लागले आहे.

* २०१९-२० मध्ये ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील २७ हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले होते.

* २०१८मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तीन हजार हेक्टरवरील भातशेती संकटात आली होती.

* यावर्षी पुन्हा एकदा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १६ हजार हेक्टरहून अधिक भातशेती संकटात आहे. पावसाचा लहरीपणा आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठत असल्याचे दिसून येत आहे.

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात भातशेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १६ हजार हेक्टरवरील भातशेतीला पावसाचा तडाखा बसला आहे. शेती नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच ते पूर्ण होईल.

– पांडुरंग शेळके, कृषी अधीक्षक, रायगड</p>

परतीचा पाऊस शेतीचे नुकसान करीत आहे.  पाणी शेतात तुंबून राहिल्याने तयार भातपिकाचे नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी तातडीने शेतातील पाणी चर खोदून बाहेर काढावे लागत आहे. त्यासाठी वेळ आणि अधिक पैसे द्यावे लागत आहेत. कापणीस तयार झालेले भातपीक तातडीने कापून त्याची झोडणी करावी लागत आहे. परतीच्या पावसाने आमची तारांबळ उडवली आहे.

– नारायण पाटील, शेतकरी, अलिबाग