युरोपीय राष्ट्रांचे कृषी मालाबाबतचे कठोर निकष पूर्ण करत द्राक्ष उत्पादकांनी २०१३-१४ या हंगामात तब्बल एक लाख ९२ हजार मेट्रीक टन निर्यात करून देशाला १६६० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवून दिले. या निर्यातीत महाराष्ट्राचा ९८ टक्के आणि त्यातही नाशिकचा ७० टक्के हिस्सा आहे.
नाशिकचे हवामान द्राक्षाला पोषक आहे. या भागात द्राक्षाचे क्षेत्र दीड लाख एकरच्या आसपास असून देशासह परदेशातील बाजारपेठ नाशिकच्या द्राक्षांनी व्यापली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा द्राक्ष बागांवर संकट कोसळल्याने उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. याचा विपरीत परिणाम देशांतर्गत भावासह द्राक्ष निर्यातीवरही होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. द्राक्ष निर्यातीत तीन वर्षांपूर्वी अकस्मात संकटांचा सामना करावा लागला होता. द्राक्षांमध्ये औषधांचे शिल्लक राहिलेले अंश अधिक असल्याचे कारण देऊन युरोपीय राष्ट्रांनी भारतीय माल नाकारला होता. त्यावेळी निर्यातीचे प्रमाण कमालीचे घटले. पुढील काळात युरोपीय राष्ट्रांच्या कठोर निकषांचे काटेकोरपणे पालन करत द्राक्ष उत्पादक निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे गतवेळच्या हंगामात आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे एक लाख ९२ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील तांत्रिक अधिकारी गोविंद हांडे यांनी दिली. या माध्यमातून देशाला १६६० कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.