माढा लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांकडे १७ कोटींची मालमत्ता असून यात ६ कोटी ७५ लाखांची जंगम, तर १० कोटी २७ लाखांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत राहणारे मोहिते-पाटील यांच्याकडे स्वमालकीची मोटार नसल्याचे दिसून येते.
शेती व सहकार क्षेत्राशी संबंधित विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या पत्नी नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांच्या नावाने अकलूज, सदाशिवनगर व मांगूर (ता. चिकोडी, जि.बेळगाव) येथे एकूण अनुक्रमे १४ एकर व १९ एकर शेतजमीन आहे. तर दोन किलो ८९० ग्रॅम सोने (किंमत ८७ लाख ५६ हजार) व १३ किलो ५०० ग्रॅम चांदी (किंमत सहा लाख ४८ हजार) मोहिते-पाटील दाम्पत्य बाळगून आहे. मोहिते-पाटील दाम्पत्याच्या नावावर ९७ लाख ७४ हजारांचे कर्ज आहे. यंत्रमाग व्यवसायासह शेती व्यवसायासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या इचलकरंजी शाखेतून तसेच बँक ऑफ बडोदाच्या अकलूज शाखेतून कर्ज घेतल्याचे मोहिते-पाटील यांनी शपथपत्रात नमूद केले आहे.
अकलूज येथे बिगरशेती जमीन, शिवरत्न बंगला (किंमत एक कोटी १६ लाख), महाबळेश्वरजवळ सिंदोळा येथे अकृषक भूखंड (किंमत २४ लाख) , मुंबईत कुर्ला येथे निवासी इमारत वरळीसागर सहकारी गृहनिर्माण संस्थेत सदनिका, (दोन कोटी ७० लाख) व कुर्ला येथे सदनिका (सहा कोटी ७४ लाख) यांचा स्थावर मालमत्तेत समावेश आहे.विविध बँकांमध्ये ठेवी, कंपन्यांमध्ये शेअर्स, राष्ट्रीय बचत पत्रे, बंधपत्रे आहेत.