राज्यातील अनेक जिल्ह्यातील स्थिती गंभीर असून, स्थलांतरित मजुरांमुळे ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. मजुरांचं स्थलांतरण वाढल्यानंतर राज्यात एकही रुग्ण नसलेल्या वा मोजके रुग्ण असलेल्या १७ जिल्ह्यांमध्ये करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. या जिल्ह्यांमध्ये आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण स्थलांतरित मजूर असल्याचं दिसून आलं आहे.

मजुरांनी घराकडे स्थलांतर केल्यास करोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात होती. ही भीती खरी ठरताना दिसू लागली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे व मालेगाव यासारख्या शहरातून प्रवास करून घरी परतलेल्या मजुरांमुळे इतर जिल्ह्यात करोनाचा शिरकाव झाला आहे. ३० एप्रिलपर्यंत मुंबई, पुणे या दोन महत्त्वाच्या हॉटस्पॉट असलेल्या शहरात राज्यातील एकूण रुग्णांपैकी ७८.४ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. ३१ एप्रिलपर्यंत या शहरातील रुग्णांसंख्या ७० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.

जिल्हा प्रशासनानं इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या सुरूवातीपासून मजुरांचे लोंढे घराच्या दिशेनं जाण्यास सुरूवात झाली. त्यानंतर मागील २० दिवसांमध्ये राज्यातील १७ जिल्ह्यांत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्या आली आहे. करोनाचा संसर्ग वाढण्यामागे मुंबई महत्त्वाचं केंद्र ठरलं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. “इतर शहरातून येणाऱ्या लोकांपेक्षा मुंबईतून परतणाऱ्या लोकांमध्ये जास्त करोना बाधित रुग्ण असल्याचं दिसून आलं आहे,” अशी माहिती बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांनी दिली. बीडमधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६२ असून, हे सर्व मुंबईत मजुरी करून पोट भरतात. बीड जिल्ह्यासारखीच परिस्थिती वर्धा, अकोला, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांची आहे. स्थलांतर केलेले जे मजूर पॉझिटिव्ह आढळून आले, ते सर्व मुंबईहून परतलेले आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

“मार्चमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर प्रशासनासमोर दोन पर्याय होते. एकतर बसेसच्या माध्यमातून मजुरांना घरी जाण्याची परवानगी देणं किंवा त्यांच्या राहण्याची खाण्याची सोय उपलब्ध करून देणं. लॉकडाउननंतर लाखो स्थलांतरित मजुरांना प्रवासाची सोय उपलब्ध करून देणं हे खूप अवघड होतं. त्यामुळे लॉकडाउनला सामोरं जाऊन त्यांची निवारागृहांमध्ये व्यवस्था करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला,” असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.