मान्सूनचे पहिले सत्र पुरते कोरडे गेल्याने ठिकठिकाणच्या जलसिंचन प्रकल्पांचा पाणीसाठा चिंताजनक असून, दुष्काळाची भीती व्यक्त होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाण्याचा सुकाळ असणा-या विभागात उभारण्यात आलेल्या जलसिंचन प्रकल्पक्षेत्रात यंदा गतवर्षीच्या तुलनेत ३५ टक्के, तर सरासरीच्या तुलनेत जवळपास ४० टक्केच पाऊस झाला आहे. सध्या या प्रमुख पाणीसाठवण प्रकल्पात १७ टक्के पाणीसाठा असून, तो गतखेपेपेक्षा ६७ टक्क्यांनी कमी राहिला आहे. आजमितीला गतवर्षी कोयना प्रकल्पात सुमारे ५० टीएमसीहून ज्यादा पाण्याची आवक झाली होती. यंदा धरणाचा पाणीसाठा ऐन पावसाळय़ात काहीसा घटल्याचे दिसून येत आहे.
प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठा, कंसात गतवर्षीची आकडेवारी – धोम ३.०५ (७.०२) टीएसमी, कण्हेर ३.१७ (६.२८), वारणा १३.०९(२५.९३), राधानगरी ३.०७(६.२९), दूधगंगा ६.०८(१५.९७), उरमोडी ४.७७(६.८०) व धोम बलकवडी ०.५८ (२.१७) टीएमसी. प्रकल्प क्षेत्रातील पाऊस, कंसात गतखेपेची आकडेवारी – धोम ४३ (४३९) मि. मी., कण्हेर ६२(३३२), वारणा ४०० (१२६४), राधानगरी ९८० (२,०९६), दूधगंगा ६२८ (१,४२३), उरमोडी १२५ (५२५), धोम बलकवडी २४६ (१२४६) मि. मी.
सलग पाच दिवस कोसळणा-या पावसामुळे खरीप हंगामाला दिलासा मिळाला आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या महाकाय कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही या पावसाचा जोर राहिल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात काहीशी वाढ झाली आहे. आज सायंकाळी ६ वाजता कोयना जलाशयाची पाणीपातळी २,०४४.७ फूट राहताना, पाणीसाठा १५.९३ म्हणजेच १५.१३ टक्के आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा ७७ टीएमसी म्हणजेच ७३.१५ टक्के नोंदला गेला होता. गेल्या ३६ तासात कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात १४९ एकूण ९३८ मि. मी, नवजा विभागात १९२ एकूण ११४३ मि. मी, तर महाबळेश्वर विभागात ११८ एकूण ६९८ मि. मी. पावसाची नोंद आहे.  हा सरासरी पाऊस ९२६.३३ मि. मी. असून, गतवर्षी आजअखेर २,४४०.३३ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. आजअखेरच्या सरासरीत कराड तालुक्यात ९४.९७ तर, पाटण तालुक्यात १५९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी हाच पाऊस अनुक्रमे २११.८ आणि  ४२९.८ मि. मी नोंदला गेला आहे.  गेल्यावर्षी दुष्काळी खटाव  तालुक्यात १४१.७, माण ९०.८ तर फलटण तालुक्यात १२३.२ मि. मी. पावसाची नोंद आहे. यंदा मात्र, पावसाच्या बहुतांश विभागात गतवर्षीच्या दुष्काळी तालुक्याइतकाही पाऊस कोसळलेला नाही.