23 April 2019

News Flash

ब्लू व्हेल गेममुळे नागपुरात १७ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

मागील तीन महिन्यांपासून ही मुलगी ब्लू व्हेल गेम खेळत होती अशीही माहिती समोर आली आहे

संग्रहित छायाचित्र

ब्लू व्हेल या गेममुळे नागपुरात एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या खेळाचे टास्क पूर्ण करण्यासाठी या मुलीने आपल्या हाताची नस कापून आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसी जोनवाल असे या मुलीचे नाव असून या मुलीचे वडील एअरफोर्समध्ये हवालदार आहेत. तीन महिन्यांपासून ही मुलगी ब्लू व्हेल गेम खेळत होती. केंद्र सरकारने या गेमवर भारतात बंदी घातली आहे. कारण देशभरात या गेममुळे बळी गेल्याच्या काही घटना मागील वर्षी घडल्या आहेत. याप्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत अशी माहिती डीसीपी निलेश भरणे यांनी दिली.

मुंबईत मनप्रित सिंग या मुलाने ब्लू व्हेलच्या आहारी जाऊन आत्महत्या केली होती. ब्लू व्हेलमुळे भारतात घडलेली ही पहिली आत्महत्या होती. त्यानंतर गुजरात, उत्तर प्रदेश, हरयाणा या राज्यांतून अशा घटना समोर आल्या होत्या. आता पुन्हा या गेमने डोकं वर काढल्याचं नागपुरातल्या आत्महत्येच्या घटनेमुळे दिसून येतं आहे. या गेममध्ये विविध प्रकारचे टास्क आहेत. या गेमची ५० वी टास्क आत्महत्या करणे ही आहे.

ब्लू व्हेल चॅलेंज हा गेम रशियातून जगभरात पसरला. आत्तापर्यंत या गेममुळे २०० पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली आहे. द ब्लू व्हेल गेम’ला 25 वर्षांच्या के. फिलीप बुडेकिन या तरुणाने २०१३ साली बनवला होता. रशियामध्ये २०१५ साली या गेमने पहिला बळी घेतला. त्यानंतर फिलीपला तुरूंगवास ठोठावण्यात आला होता. फिलीपच्या मते हा गेम समाजातील बायोलॉजिकल कचऱ्याच्या साफसफाईसाठी आहे असे त्याने म्हटले होते.

नेमका आहे तरी काय आहे हा ब्लू व्हेल गेम?
ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये प्रत्येक प्लेयरला एक मास्टर मिळतो
अँड्रॉईडवरून हा गेम एकदा डाऊनलोड केला की डिलिट करता येत नाही.
रक्तानं ब्लू व्हेल कोरणे, भीतीदायक सिनेमा पाहणं असे टास्क दिले जातात
गेमचा मास्टर ५० दिवस प्लेयरवर नियंत्रण ठेवतो आणि सगळे टास्क पूर्ण करायला भाग पाडतो
हा गेम एकूण ५० लेव्हल्सचा आहे, यातील ५० वी लेव्हल आत्महत्या करणे आहे.

First Published on December 6, 2018 6:42 pm

Web Title: 17 years girl commits suicide because of blue whale game in nagpur