नापिकीमुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेपोटी औंढा नागनाथ तालुक्यातील पारडी सावळी येथील शेतकरी सोपान सांगळे यांनी गळफास घेऊन, तर एकबुर्जीवाडी येथील शेतकरी संदीप कुटे यांनी विष घेऊन आत्महत्या केली. औंढा पोलिसात या प्रकरणी नोंद झाली. दरम्यान, चालू वर्षी आतापर्यंत एकूण १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदत मिळण्यास पात्र ठरल्या. तीन अपात्र, तर दोन प्रकरणी फेरचौकशी सुरू आहे. परंतु ताज्या घटनांमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र चालूच असल्याचे स्पष्ट होत आहे.
समितीसमोर निर्णयासाठी २९ ऑक्टोबरपूर्वीची ३ प्रकरणे प्रलंबित होती. आत्महत्याग्रस्त पात्र १२ शेतकऱ्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १ लाख याप्रमाणे एकूण १२ लाखांची मदत देण्यात आल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. पूर्वीची तीन प्रकरणे समितीसमोर निर्णयासाठी असताना आता नव्याने दोन घटनांची नोंद झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील एकबुर्जीवाडी येथील संदीप कुटे (वय ३१) यांनी आपल्या चार एकर शेतीतून केवळ तीन पोते सोयाबीन उत्पादन निघाल्याने निराश होत बुधवारी विषारी औषध घेतले. सुरुवातीला त्यांना औंढय़ाच्या, नंतर नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुवारी त्यांचे निधन झाले.
औंढा तालुक्यातील पार्डी (सावळी) येथील सोपान किशन सांगळे (वय ६०) यांनी नापिकी झाल्याने बँकेचे ५० हजारांचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांचा मुलगा विष्णू याने औंढा नागनाथ पोलिसात दिलेल्या माहितीवरून या प्रकरणाची नोंद झाली.