आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्राथमिक शिक्षकांकडून झालेली मदत म्हणजे शिक्षकांच्या संवेदना जागरुक असल्याचेच प्रतीक आहे, ही घटना शेतकऱ्यांमध्ये मानसिक धैर्य निर्माण करणारी आहे, शेतकऱ्यांनीही परिस्थितुन निराश न होता, प्रशासन, सरकार व समाजही तुमच्याबरोबर आहे, अशी खात्री बाळगावी, त्यासाठी सामुहिक अंमलबजावणी व समन्वयातून विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले.
राज्य प्राथमिक शिक्षक समितीची जिल्हा शाखा व गुरुकुल मंडळप्रेमी शिक्षकांच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी, सुमारे साडेतीन हजारावर शिक्षकांकडून सुमारे १७ लाख ७९ हजार ९१० रुपयांच्या ‘शेतकरी सहायता निधी’चे संकलन केले. या निधीचे वितरण नगर जिल्ह्य़ातील ५९ व बीडमधील एक अशा एकूण ६० शेतकऱ्यांच्या वारसांना, प्रत्येकी २९ हजार ६६५ रुपयांच्या धनादेशांचे वितरण ओम गार्डन मंगल कार्यालयात करण्यात आले, त्यावेळी कवडे बोलत होते.
यावेळी कवडे, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर, कृषि समितीचे सभापती शरद नवले, संघटनेचे राज्यअध्यक्ष कडुनाना बोरसे, बाळासाहेब पवार, शिक्षणाधिकारी अशोक कडुस, उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे आदींच्या हस्ते ज्वारीच्या ताटाला पाणी घालून प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले. कवी प्रशांत मोरे यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर सादर केलेल्या कवितांना उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेतील शिक्षक सभासदांच्या वर्तनाबद्दल कानपिचक्या देऊन कवडे म्हणाले की, या वर्तनाबद्दल शिक्षकांनी खरेतर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. शिक्षक समाजातील विचार करणारा घटक आहे, त्याची शाळा हे गावातील विचारांचे स्फुर्तीस्थान होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवनमुल्यांचेही विचार शिक्षकांनी विद्यार्थ्यांत रुजवावेत. राज्य अध्यक्ष बोरसे यांनी, जिल्हा शाखेच्या उपक्रमाचे कौतुक करुन मदतीचा ‘नगर पॅटर्न’ राज्यभर राबवण्याचे जाहीर केले. संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. संजय कळमकर यांनी प्रास्ताविक केले. या मदतीने शेतकऱ्यांच्या जीवनातील अंधार संपवु शकत नसला तरी या मदतीतुन त्यांच्या घरात दिवाळीत पणती लागली जावी, हाच उद्देश आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचे प्रश्न सुटले परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहीले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देणारे मोठे झाले परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नात वाढ झाली, त्याच्याच परिणामातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अशी खंत कळमकर यांनी व्यक्त केली.
यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शोभा बनकर (मिरजगाव, कर्जत), पवार, संघटनेचे पदाधिकारी अनिल आंधळे, संजय धामणे आदींची भाषणे झाली. प्राथमिक शिक्षक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.