उपचारांसाठी रुग्णांना मुंबईचा आसरा घ्यावा लागतोय

आधीच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे मेटाकुटीस आलेल्या जिल्हा आरोग्य यंत्रणेसमोर गरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्य़ात १८ वैद्यकीय अधिकारी अनधिकृतपणे गरहजर आहेत. यामुळे जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. यामुळे रुग्णांना उपचारांकरिता मुंबईतील रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागत असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे.  रायगड जिल्ह्य़ात १ जिल्हा रुग्णालय, ५ उपजिल्हा रुग्णालये, ८ ग्रामीण रुग्णालये आहेत. या रुग्णालयांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भेडसावत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. तर १८ वैद्यकीय अधिकारी अनधिकृतपणे गरहजर आहेत. यामुळे कार्यरत वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिषक, सर्जन, कान-नाक-घसातज्ज्ञ, रेडीऑलॉजिस्ट यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे  रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे  मार्गदर्शन मिळू शकत नाही. तर दुर्धर आजारांवरील शस्त्रक्रियादेखील होऊ शकत नाही. त्यामुळे रुग्णांना पुढील उपचारांकरिता मुंबईतील रुग्णालयांमध्ये पाठवावे लागते. या दरम्यानच्या प्रवासात गंभीर असलेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

रायगड जिल्ह्य़ात वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १९ पदे असून, त्यापकी ९ पदे भरली आहेत. मात्र यांमधील १ वैद्यकीय अधिकारी गरहजर आहे. तर वर्ग दोनच्या १०० पदांपकी ५९ पदे भरली आहेत, यातील प्रत्यक्षात ४२ वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत असून, १७ वैद्यकीय अधिकारी गरहजर राहिले आहेत.

राज्य आरोग्य विभागाकडून रायगड जिल्ह्य़ात हजर होण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश काढण्यात येतात. मात्र बरेच अधिकारी रुग्णालयात हजर झाल्यानंतर काही दिवसांतच जिल्ह्य़ातून पळ काढीत आहेत. जिल्ह्य़ात असे १८ वैद्यकीय अधिकारी परस्पर रजेवर गेले आहेत. रजेवर जाताना या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याची बाबही समोर आली आहे.

‘गरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती वरिष्ठ विभागाकडे पाठविण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावीत. यासाठी सरकारस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. वेळोवेळी त्याबाबत पत्रव्यवहार केला जात आहे. लवकरच ही पदे  भरली जातील. तोवर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने चांगली रुग्णसेवा देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.’ डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक.

 [jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]