दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात सर्वाधिक ३२ साखर कारखाने सुरू असून यंदाच्या गळीत हंगामात सुमारे दोन कोटी मे. टन उसाचे गाळप होत आहे. तर दुष्काळाचा भाग म्हणून नेहमीच ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढय़ातही उसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. या भागात चार साखर कारखाने चालू असून त्यात आतापर्यंत १८ लाख मे. टन ऊस गाळप झाल्याची माहिती पुढे आली आहे.
मंगळवेढा भागातील दुष्काळाला परंपरा आहे. दुर्गाडीचा दुष्काळ म्हणून इतिहासात नोंद याच मंगळवेढय़ाच्या अनुषंगाने झाल्याचे मानले जाते. दुष्काळात गोरगरीब शेतकरी व जनतेची होरपळ थांबण्यासाठी मंगळवेढय़ात संत दामाजीपंतांनी बहामनी सुलतानाचे धान्याचे भरलेले कोठार गोरगरिबांना खुले केले होते, अशीही माहिती सांगितली जाते. दुष्काळाची परंपरा आतापर्यंत सतत चालत असतानाच्या पाश्र्वभूमीवर सध्या या दुष्काळी भागात उसाचे उत्पादन विक्रमी स्वरूपात घेतले जात आहे. त्यामुळे ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढय़ाला यापुढे उसाचा पट्टा म्हणावे लागणार आहे.
या तालुक्यात गेल्या २५ वर्षांपासून संत दामाजी हा एकमेव सहकारी साखर कारखाना चालत होता.  परंतु उसाचे क्षेत्र वाढू लागले तसे इतर तीन खासगी साखर कारखाने याच भागात उभारले गेले आहेत. संत दामाजी सहकारी साखर कारखान्यासह फॅबटेक शुगर, भैरवनाथ शुगर व युटोपियन शुगर हे साखर कारखाने सुरू असून यात आतापर्यंत १८ लाख ६ हजार मे. टन उसाचे गाळप होऊन १९ लाख ३५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे.
संत दामाजी साखर कारखान्याकडे १० हजार हेक्टर क्षेत्रातील उसाची नोंद आहे. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख ७५ हजार मे. टन उसाचे गाळप झाले आहे. यात साखर उतारा ११.१७ टक्के इतका मिळाला आहे. तर फॅबटेक साखर कारखान्याकडे सात लाख मे. टन उसाची नोंद असून त्यापैकी आतापर्यंत सहा लाख १० हजार मे. टन उसाचे गाळप (११.२८ टक्के साखर उतारा) झाले आहे. आणखी ९० हजार मे. टन उसाचे गाळप व्हायचे आहे. भैरवनाथ साखर कारखान्याने आतापर्यंत तीन लाख ७५ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. आणखी तीन लाख २५ हजार मे. टन उसाचे गाळप होणे बाकी आहे. या साखर कारखान्यात १२ मेगावॉट सहवीज निर्मिती प्रकल्पही कार्यान्वित असून यात सात कोटी १३ लाख ३३ हजार युनिट वीज निर्मिती झाली आहे.
युटोपियन साखर कारखान्याने तीन लाख ५५ हजार ३०० मे. टन उसाचे गाळप केले आहे. आणखी दीड लाख उसाचे गाळप होणार आहे. याशिवाय १४.८ मेगावॉट सहवीज निर्मितीचा प्रकल्प सुरू असून त्याद्वारे तीन कोटी ६० लाख ७६ हजार युनिट वीजनिमिती झाली आहे.