उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापूर जिल्ह्य़ातील आठ मध्यम प्रकल्पांतील पाण्याच्या साठय़ाची स्थिती गतवर्षांपेक्षा यंदा चांगली असून सध्या मध्यम प्रकल्पांमध्ये १७.८७ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. तर उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा १४.३२ टक्के इतका आहे.
यंदा मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण ४०.३८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १७.८७ एवढी आहे. मागील सलग दोन  वर्षे जिल्ह्य़ावर दुष्काळाचे संकट कोसळले होते. गतवर्षी याच सुमारास मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा केवळ ४.४० टक्के इतका होता. यंदा सलग दोन वर्षांनंतर सुदैवाने चांगला पाऊस झाल्यामुळे तसेच गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाल्यामुळे मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठय़ाची स्थिती चांगली आहे. मात्र यापैकी बुध्देहाळ प्रकल्पातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. पिंबळगाव-ढाळे प्रकल्पात सर्वाधिक ४९.५० टक्के पाणीसाठा आहे, तर त्याखालोखाल िहगणी-४५.६१ टक्के, आष्टी-४०.४८ टक्के, जवळगाव-१२.८१,मांगी-१०.९६ टक्के, बोरी-५.११ टक्के व एकरूख-४.१२ टक्के, याप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्य़ात ५३ लघु पाटबंधारे प्रकल्प असून त्यातील पाण्याची उपलब्धता सध्या ८.२० दशलक्ष घनमीटर इतकी आहे.
संपूर्ण जिल्ह्य़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात सध्या उपलब्ध पाण्याची टक्केवारी १४.३२ इतकी आहे. गतवर्षी याच कालावधीत या धरणात पाणीसाठी खालावला जाऊन वजा ३३.१० टक्के इतका पाणीसाठा होता.