नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी गुन्हेगारांविरुध्द काल रात्री ऑपरेशन ऑल ऑऊट योजना राबवून सुमारे १८ संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले. या मोहिमेत शेवगाव पोलिसांनी दरोडेखोरांची पाच जणांची टोळी पकडली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा, चाकू, तलवार आदी प्राणघातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी न्यानकू संसाऱ्या भोसले (वय ३०, रा. औद्योगिक वसाहत, नगर), विष्णू दलाजी काळे (वय २०, रा. हातगाव, ता. शेवगाव), सुनिल निऱ्हाळ्या भोसले (वय २१) व नागनाथ अवचित काळे (वय ३९, दोघे रा. पाथर्डी रस्ता, ता. शेवगाव), अश्पाक वैभव काळे (वय ३०, रा. हिंगणगाव, ता. शेवगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

शेवगाव व परिसरात घरफोडय़ांचे सत्र सुरू झाले होते. त्यामुळे कोबग ऑपरेशन सुरू करण्यात आले. काल पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे, निरीक्षक सुरेश सपकाळे, उपनिरीक्षक नितीन मगर, पोलीस कर्मचारी सुहास हट्टेकर, रवींद्र शेळके, महादेव घाडगे, राजेंद्र चव्हाण, भाऊसाहेब खेडकर, राहुल नरवडे, प्रवीण बागुल, सुरेश टकले, युसूफ सय्यद आदींच्या पथकाने सापळा रचून आरोपींना शेवगाव-पाथर्डी रस्त्यावरील भगूर शिवारात एका पेट्रोल पंपाजवळ अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन सुरे, गुप्ती, तलवार व दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. एक दुचाकी नवीन असून तिची परिवहन विभागाकडे नोंदणीही करण्यात आलेली नाही. पोलीस नाईक रवींद्र शेळके यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी पढेगाव येथे छापा टाकून पाच आरोपींना पकडले. त्यांच्याकडून चाकू, कोयते व तलवारी हस्तगत करण्यात आल्या. पाथर्डी पोलिसांनी दरोडय़ाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली. तर राहाता पोलिसांनी रांजणगाव येथे एका आरोपीकडून तलवार हस्तगत केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बोर्डे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने बेलापूर येथील काशिनाथ भानुदास बर्डे (वय २३) व आसिफ मुनीर शेख (वय २२) या दोघा घरफोडय़ा करणाऱ्या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पांढरीचा पूल येथे केलेल्या चोरीतील लॅपटॉप, चार मोबाईल असा ऐवज जप्त केला. त्यांनी पांढरीचा पूल येथील मोबाईल शॉपी फोडून चोरी केल्याची कबुली दिली. आसिफ शेख हा एका खून प्रकरणातील आरोपी असून तो जामीनावर सुटलेला आहे.

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनशाम पाटील व रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ऑपरेशन ऑल ऑऊट ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात घरफोडय़ा, चोऱ्या व दरोडे वाढले असून त्यांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.