करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी १८९ पोलीस करोनाबाधित आढळले असून, चार पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता २२ हजार ८१८ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले(अॅक्टिव्ह केसेस) ३ हजार १८८ जण, करोनातून बरे झालेले १९ हजार ३८५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २४५ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील एकूण २२ हजार ८१८ करोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार ४९५ अधिकारी व २० हजार ३२३ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार १८८ पोलिसांमध्ये ३८५ अधिकारी व २ हजार ८०३ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या १९ हजार ३८५ पोलिसांमध्ये अधिकारी २ हजार ८५ व १७ हजार ३०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या २४५ पोलिसांमध्ये २५ अधिकारी व २२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे.