वार्षिक ४५५ कोटी रुपयांचा खर्च

उमाकांत देशपांडे, मुंबई</strong>

आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना मानधन देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार आतापर्यंत १९०६ व्यक्तींना मानधन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी वार्षिक ४५५ कोटी रुपये खर्च येणार आहे. मानधन मिळालेल्या सर्वाधिक व्यक्ती पुणे जिल्ह्य़ातील असून तेथे ४६८ जणांना तर त्याखालोखाल नागपूरमध्ये १२६ जणांना मानधन सुरू झाले आहे. तर सर्वात कमी म्हणजे चार व्यक्तींना रायगड जिल्ह्य़ात मानधन मिळाले आहे.

आणीबाणीत एक महिन्याहून अधिक काळ तुरुंगवास भोगलेल्यांना दरमहा १० हजार रुपये आणि एक महिन्यापेक्षा कमी तुरुंगवास भोगलेल्यांना दरमहा पाच हजार रुपये तर व्यक्ती हयात नसल्यास पती किंवा पत्नीस निम्मे मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारने ३ जुलै २०१८ रोजी घेतला होता. त्यानंतर राज्यभरात जिल्हाधिकारी स्तरावर अर्ज मागविण्यात आले. अर्ज व कागदपत्रांची छाननी करून मंजूर करण्यात येत असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

२५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या आणीबाणीच्या कालावधीत तुरुंगात असलेल्यांना हे मानधन सुरू करण्यात आले असून १९०६ व्यक्तींसाठी वार्षिक ४५५ कोटी रुपये इतका निधी लागणे अपेक्षित आहे. आणखी अर्ज मंजूर झाल्यावर अधिक निधी लागेल आणि गरजेनुसार पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली जाईल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले स्वातंत्र्यसैनिक आणि आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्ती यांना समान दर्जा किंवा त्याप्रमाणे मानधन देण्याची पद्धत चुकीची आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणीबाणीच्या वेळी माफीही मागितली होती. आपण काहीतरी वेगळे करून दाखवायचे, या हेतूने आणीबाणीतील व्यक्तींना मानधन देणे चुकीचे आहे.

– सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते