सोलापूर शहर व जिल्ह्यात करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी विशेषतः मृत्युचा वाढलेला दर नियंत्रणात आणण्यासाठी जलद चाचण्या (ॲन्टिजेन टेस्ट) होत आहेत. आज(बुधवार) एकूण २ हजार ३९९ चाचण्या होऊन त्यात १९८ नवे बाधित रूग्ण आढळून आले. यात चार मृतांचा समावेश आहे.

शहरात १ हजार २ चाचण्यांद्वारे ६४ नवीन बाधित रूग्णांचा शोध घेण्यात आला. यात चौघा मृतांचा समावेश आहे. तर जिल्हा ग्रामीणमध्ये दिवसभरात १ हजार ३९७ जलद चाचण्या करून १३४ नवीन बाधित रूग्णांचा शोध घेण्यात आला. शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात आढळून आलेल्या रूग्णांची संख्या २ हजार २७५ झाली असून, त्यात ४८ मृतांचा समावेश आहे. तर आतापर्यंत ६६२ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

सोलापूर शहरात आज १ हजार २ चाचण्या घेण्यात आल्या असता त्यातून तुलनेने कमी म्हणजे ६४ बाधित रूग्ण सापडले. एकूण रूग्णसंख्या ४ हजार ५२ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ३३३ वर गेला आहे. आतापर्यंत २हजार २४२ रूग्ण करोनामुक्त झाले आहे. त्याचे शेकडा प्रमाण ५५.३३ एवढे आहे.

जलद चाचण्यांची (ॲन्टिजेन टेस्ट) मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत असले, तरी त्यात करोनाची लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्या किती आहे, याचा तपशील समोर आलेला नाही.