नवा गणवेश, नवे दप्तर, नव्या वह्य़ापुस्तके घेऊन विद्यार्थी सोमवारपासून पुन्हा शाळेत येऊ लागल्याने शाळा पुन्हा बहरल्या. नव्या शैक्षणिक वर्षास आजपासून सुरुवात झाली. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक अशा सर्वांनीच साजरा केला. नवागतांच्या स्वागतानंतर शाळा लवकरच सोडण्यात आल्या. अनेक शाळांमध्ये नव्या उपक्रमांना सुरुवात झाली.
शाळेचा पहिला दिवस आनंददायी उपक्रमांनी सुरू करा, अशी सूचनाच शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. पूर्व प्राथमिक व प्राथमिक वर्गातून त्याला चांगला प्रतिसाद देण्यात आला. पहिलाच दिवस असल्याने पालक पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी आवर्जून आले होते. या सर्वांचेच शिक्षक, संस्थाचालकांनी स्वागत केले. अनेक ठिकाणी गुलाबपुष्पे देण्यात आली, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, काही ठिकाणी तर चक्क मंगल सनई चौघडय़ांचे सूरही ऐकू येत होते. विद्यार्थ्यांच्या प्रभात फे-याही निघाल्या. प्रथमच शाळेत प्रवेश करणा-या लहान मुलांचे चेहरे रडवेले झाले होते, पालक, शिक्षक त्यांची समजूत काढत शाळेत नेत होते. सरकारी अनुदानातील शाळांमध्ये मोफत पाठय़पुस्तकांचे वाटपही करण्यात आले.
महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते महापालिकेच्या, रेल्वे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत करत त्यांना पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मुलांना लोकसहभागातून चक्क गोड जेवण देण्यात आले. जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनीही विविध शाळांना भेटी दिल्या. नवाल यांनी भेट दिलेल्या शिराळा (ता. पाथर्डी) येथील शाळेत अस्वच्छता, नवागतांचे स्वागत उपक्रम आयोजित न केल्याने तेथील मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली.
जि. प.च्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती सक्तीची करण्यात आली होती, मात्र सर्वसाधारणपणे ६० ते ६५ टक्के उपस्थिती आढळली. जिल्ह्य़ातील एकूण ५ लाख ९० हजार ३ विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचा लाभ मिळणार आहे. जि. प.च्या शाळांतील सुमारे पावणे तीन लाख विद्यार्थ्यांपैकी बहुसंख्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळाली.