सातारा येथील पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी व ऐतिहसिक वास्तूंच्या सुशोभीकरणासाठी नियोजन मंडळातून अडीच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून अडीच कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मान्य केल्याची माहिती  खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

सातारा शहराला व जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा अनेकांना प्रेरणा देत असतात. काही ऐतिहासिक वास्तू काळाबरोबर नामशेष झाल्या तर काही वास्तु आजही अस्तित्वात आहेत. या वास्तूंचे जतन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकास साजेसा पुतळा पोवईनाका येथे आहे. या परिसराचे सुशोभीकरण आणि चबुतऱ्याची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले आहे.

या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामास सुमारे अडीच कोटी रुपये आवश्यक आहेत. ही तरतूद जिल्हा नियोजन समितीतून तातडीने करण्यात यावी, याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी तथा नियोजन समितीचे सदस्य सचिव शेखर सिंह यांच्याकडे मागणी केली. त्यासाठी उदयनराजेंनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, गणेश भोसले, संग्राम बर्गे, राम हादगे, जितेंद्र खानविलकर उपस्थित होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी मागणी मान्य केल्याबद्दल पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आभार मानले आहेत.