निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मराठवाडय़ातील ज्या सहा मतदारसंघात मतदान झाले, तेथे आतापर्यंत वेगवेगळ्या ३२ घटनांमध्ये सुमारे अडीच कोटींची रक्कम रोख स्वरूपात सापडली. एका गावावरून दुसऱ्या गावाला गाडीतून नेण्यात येत असलेली ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठी होती का, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आयकर विभागातील अधिकारी अजून आले नाहीत.
पैसे पकडल्याच्या घटना नांदेड जिल्ह्य़ात सर्वाधिक होत्या. हा पैसा ‘व्यापाऱ्यां’चा होता, असा दावा केला जात आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी उस्मानाबादेत १२ लाखांची रक्कम सापडली, तर बीडमध्ये ४० लाखांची रक्कम टेम्पोमधून जाताना ‘लुटून’ नेण्यात आल्याची तक्रार भाजपने केली. या ४० लाखांचा स्रोत आयकर विभागाकडून तपासला जाण्याची शक्यता आहे. तथापि, तशी अधिकृत माहिती आयकर विभागाला दिली गेली नाही, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
निवडणुकीच्या काळात चेकपोस्ट आणि नाक्यांवर पोलिसांमार्फत तपासणी केली जाते. या तपासणीच्या कालावधीत ३२ प्रकरणांमध्ये रक्कम सापडल्याच्या नोंदी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविल्या गेल्या. या प्रत्येक घटनेत सापडलेली रक्कम नक्की कोठून आली? वाहतूक करणारा कोण होता? मालक कोण? याची तपासणी आयकराच्या अंगाने केली गेली. काही प्रकरणांमध्ये आयकर चुकविल्याचे अहवाल पाठविण्यात आले. वेगवेगळ्या पथकांमार्फत होणाऱ्या तपासण्यांमुळे प्रमुख राजकीय पक्षांची नेतेमंडळी ‘पैसे’ वाटताना किमान काळजी घेतील, असे अभिप्रेत होते. सापडलेली रक्कम व्यापारासाठी काढली, अशी कागदपत्रे सादर केली की, ती संबंधितांना परत केली जाते. त्याचा पद्धतशीर फायदा-गैरफायदा घेतला गेला.
परळी येथे मतदानाच्या आदल्या दिवशी ४० लाख रक्कम लुटून नेल्याची तक्रार फुलचंद कराड यांनी दिली. परळीचे माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी जीनिंग व तेल उद्योगासाठी टेम्पोमधून ४० लाख रुपये पाठविले होते. टेम्पोचा चालक शिवशंकर गुरलिंगप्पा व्यवहारे हा होता. गाडीतील मुनीम व चालकाला मारहाण करून ही रक्कम लांबविली गेली. मात्र, ४० लाखांची रक्कम टेम्पोसारख्या वाहनातून का पाठविली? एवढी मोठी रक्कम पाठवताना टेम्पोसमवेत कोणी जबाबदार व्यक्ती होती का? असे प्रश्न बीड मतदारसंघात चर्चेचा विषय झाले आहेत. ही रक्कम वैध आर्थिक स्रोताची होती का, याची तपासणी केली जाईल का, असा प्रश्न आयकर विभागातील अधिकाऱ्यांना विचारला असता, या घटनेची अधिकृत माहिती अजून विभागाला दिली गेली नाही. मात्र, त्याची चौकशी केली जाईल. जुगलकिशोर लोहिया हे भाजपचे आहेत, हे विशेष. रक्कम लुटून नेल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आहे. तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावरील लोकमंगलच्या टोलनाक्याजवळ एका गाडीत खूप पैसे असल्याची तक्रार निवडणूक निरीक्षकांकडे करण्यात आली. गाडीतून १२ लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली. लोकमंगल उद्योगसमूह रोहन देशमुख यांचे वडील सुभाष देशमुख यांच्या मालकीचे आहे.