जातीअंताच्या चळवळीतील महत्वाचा भाग असणाऱ्या आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. याअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला आता अडीच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यापूर्वी ही रक्कम पन्नास हजार रुपये इतकी होती. गुरुवारी, ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी ही घोषणा केली.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील अबुल कलाम आझाद सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बडोले यांनी ही घोषणा केली. यावेळी आंतरजातीय विवाहांमध्ये अडथळे ठरणाऱ्या ऑनर किलिंगसारख्या प्रकाराविरोधात संघर्ष तीव्र करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यांत पहिल्या सामुदायिक आंतरजातीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही बडोले यांनी दिली आहे. या सोहळ्यात सहभागी होऊन संबंधित जोडप्यांनी विवाह करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, आंतरजातीय विवाह कायद्यात अमुलाग्र बदल करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी बडोले यांनी दिली. ऑनर किलिंगसारख्या घटनांपासून अशा दाम्पत्यांच्या मुलांना संरक्षण देणे, आंतरजातीय विवाहासाठी विशेष प्रोत्साहन योजना राबवणे, शासकीय लाभ मिळवून देणे, अपत्यांना सवलती देणे अशा बाबींचा यात समावेश असेल. या संशोधन कायद्याचा मसुदाही तयार असल्याचे बडोले यांनी यावेळी सांगितले.