राहुरीचे तहसीलदार दादासाहेब गिते यांच्यासह महसूल खात्याच्या पथकाच्या अंगावर वाळूचा डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी संदीप बबन बर्डे व भारत भाऊसाहेब शेडगे या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गिते यांच्यासह पथकावर हल्ला करणारे हल्लेखोर शोधून काढणे तसेच या घटनेमागे असलेल्या वाळूतस्करांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक रजपूत यांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी याप्रकरणाचा कसून शोध घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
राहुरीचे तहसीलदार गिते हे मंगळवार दि.१२ रोजी सायंकाळी ५ वाजता एमएच १७ डब्ल्यू ९० या सरकारी मोटारीसह चालक ज्ञानेश्वर राऊत, तलाठी विकास शिंदे, मिलिंद जाधव तसेच स्वत: एमएच १६ एजे ७११ या इंडिका गाडीतून तलाठी राजेंद्र बकरे, अभिजित खटावकर, दीपक भिंगारदिवे यांच्यासह दोन पथके घेऊन बेकायदा वाळू वाहतूक करणा-या मोटारी पकडायला निघाले होते. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून त्यांनी वाळूवाहतूक करणा-या डंपरचा शोध सुरू केला होता. प्रवेशद्वाराजवळ ते उभे असताना एमएच १६ एएस ३०११ या क्रमांकाचा वाळू घेऊन निघालेला डंपर आला. त्याला थांबण्याचा इशारा करताच तो भरधाव वेगात निघाला. त्याचा पाठलाग करताच त्याने डंपर तहसीलदार गिते यांच्या गाडीवर घातला. महसूल खात्याच्या पथकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी डंपरचा चालक संदीप बर्डे व भाऊसाहेब शेटे यांना अटक करण्यात आली आहे.
राहुरी पोलीस ठाण्याच्या तपासणीला पोलीस अधीक्षक शिंदे व उपाधीक्षक अंबादास गांगुर्डे हे आलेले होते. वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात असताना वाळूतस्करांनी तहसीलदारांनाच चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. या डंपरच्या मागे वाळूतस्करांच्या गाडय़ा होत्या. वाळूतस्करांकडून महसूल व पोलिसांना सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचा हप्ता मिळतो. त्यामुळे कारवाई होत नाही. गिते यांच्यावरील हल्ल्यामुळे तरी आता कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी होत आहे.