बनावट आदेश तयार करून इस्लामपूर येथील ट्रस्टची मालमत्ता हस्तांतर केल्याप्रकरणी तत्कालीन धर्मादाय आयुक्तांसह दोघांना काल रात्री अटक करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली असून, दोघांनाही न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले.  
सहायक धर्मादाय आयुक्तांचा बनावट आदेश तयार करून इस्लामपूर येथील पीरराजे बागसाब ऊर्फ राजे भास्कर ट्रस्टबाबत मालमत्ता हस्तांतर करून फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन धर्मादाय आयुक्त चंद्रकांत साने व लेखापाल विठ्ठल रेळेकर व प्रमोद खुडे यांच्याविरुद्ध फसवणूक केली असल्याची तक्रार कार्यालयीन अधीक्षक ए. बी. भुईंबर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच साने व खुडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव केली. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज नाकारल्यानंतर उच्च न्यायायात अपील करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर चंद्रकांत साने व प्रमोद खुडे यांना सांगली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने गुरुवारी या दोघांना दि. २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.