राज्यातील साखर उद्योग डबघाईस आल्यानंतर एफआरपी साखरेचे उतरते भाव व मोलॅसेसवरील निर्यातबंदी या सर्व प्रकारामुळे शेतकरी व साखर उद्योग देशोधडीला लागले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी व साखर उद्योगास २ हजार कोटीचे पॅकेज जाहीर करणे म्हणजे वराती मागून घोडे नाचविण्याचा प्रकार राज्य शासनाने केला आहे, असे वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी म्हटले आहे.
गेल्या ३ वर्षांपासून साखरेचे भाव सतत घसरत असल्यामुळे साखर कारखाना चालविण्याकरिता तारेवरची कसरत सुरू असून बाजारपेठेत साखर कारखाना वगळता कुठल्याच वस्तूंचे भाव एवढय़ा मोठय़ा प्रमाणात घसरले नाहीत. ३९ रुपये प्रतिकिलोची साखर २१ रुपयांवर आल्यामुळे साखर उद्योगाचे गणित पूर्णत: कोलमडले आहे.
सरकार म्हणून आपत्तीजनक परिस्थितीत व्यक्ती किंवा संस्थेला मदत देणे गरजेचे असते, परंतु राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी साखर उद्योगाला तुटपुंजे पॅकेज देऊन दिलासा देण्याचे औदार्य दाखविले. साखर कारखान्यांना अच्छे दिन यावे म्हणून ज्या घोषणा केल्या त्या नेमक्या कधीपासून लागू होतील, हे सध्या सांगणे अवघड आहे.
सर्व घोषणा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केल्या असत्या तर रोग बळकावण्यापूर्वी साखर उद्योगाला संजीवनी मिळाली असती. उदाहरणार्थ मोलॅसेसवरील निर्यात बंदी उठविणे, बफर स्टॉक करण्याची परवानगी पाहिजे, परंतु साखर कारखाने अतिशय अडचणीत असल्यामुळे इच्छा नसतांनाही ९० टक्के कारखान्यांनी मातीमोल भावाने विकली आहे.
शासनाने २ हजार कोटी रुपये बिनव्याजी कर्ज जाहीर केले, परंतु अद्याप कुठल्याही जीआर किंवा तत्सम निर्णय कारखान्यापर्यंत पोहचले नाहीत. एफआरपीचा प्रश्न व साखर दर घसरल्यामुळे कामगारांचे पगार, तोडणी, वाहतूक शासकीय कर, व्यापारी व ठेकेदारांचे कोटय़वधी रुपये थकल्यामुळे वेगळा अभ्यासू गट नेमून आíथक उपाययोजना शासनाने करण्याची आवश्यकता आहे. या हंगामात १ लाख िक्वटल साखर केन पेंमेटसाठी विकावीच लागली. यामुळे येणारा हंगाम सुरू होण्यापूर्वीच कारखान्याची आíथक घडी बसविली तरच शेतकरी व साखर उद्योग टिकाव धरेल, असा आशावाद देवसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा पदाधिकाऱ्यांची वसंतच्या विरोधात अनेक आरोप केले. याबाबत विचारल्यावर ते म्हणाले की, ज्या लोकांनी आरोप केले त्यांना साखर कारखानदारीबाबत व उसाबाबत कुठलीही माहिती नाही. त्यामुळे त्यांनी आगामी होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिनबुडाचे आरोप केले आहेत. तरीही यांचा खुलसा येत्या दोन दिवसात संचालक मंडळ जनतेसमोर करणार आहे.