कोपरगाव शहराला दोन दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा येसगाव येथील नगरपालिकेच्या साठवण तलावात शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार असून, आवर्तन न सोडल्यास मोठय़ा असंतोषाची चिन्हे आहेत. ती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी नगराध्यक्ष ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांनी जिल्हधिकारी व नाशिक पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 सातभाई उद्या (बुधवार) नगराध्यक्षांचा पदभार स्वीकारणार आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालिकेच्या येसगाव येथील चार साठवण तलावांपकी दोन तलाव पूर्ण कोरडेठाक तर अन्य दोन तलावांत केवळ तीन फूट पाणी शिल्लक आहे. सध्या शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे आता गोदावरी डाव्या तटकालव्यातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन आल्याशिवाय शहराला पाणी पुरवताच येणार नाही अशी स्थिती आहे. आमदार शंकरराव काळे, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, स्वाभिमान विकास आघाडीचे नितीनराव औताडे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ नाशिक पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
 कोल्हे यांचा उद्विग्न सवाल
तालुक्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे, मात्र हे शासन पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळय़ासाठी सध्याचे पाणी साठवून ठेवण्याच्या विचारात आहे, तेव्हा आम्ही मेल्यावर पाणी देणार का, असा संतप्त सवाल माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी साईबाबा संस्थानकडे पसे मागणे गर नाही, मात्र त्या धरणाचा ज्यांना अधिक फायदा आहे, ते या प्रश्नावर गप्प असून शासनाकडून निधी मिळविण्यासाठी का झगडत नाहीत, असा प्रश्नही कोल्हे यांनी उपस्थित केला.