जिल्ह्य़ात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दोघांचा बळी घेतला असून चोपडा तालुक्यात पुरामध्ये मायलेकी वाहून गेल्या. तसेच चार बैलांचा मृत्यू झाला.

सकाळपासून रिमझिम सुरू असलेल्या चोपडा तालुक्यास दुपारनंतर पावसाने चांगलेच झोडपून काढले. लासूर परिसरात दुपारी दोनच्या सुमारास शेतातील काम आटोपून उषाबाई जगदीश चांभार (४०) आणि प्रणाली (१८) या मायलेकी बैलगाडीने घराकडे येत होत्या. हातेंड रस्त्यावरील डाबका नाला दुथडी भरून वाहत असतानाही हाकणाऱ्याने बैलगाडी पुढे जाऊ दिली. जोरदार प्रवाहामुळे बैलगाडी वाहून गेली. दोन किलोमीटरवर उषाबाईचा तर, घटनास्थळापासून काही अंतरावर प्रणालीचा मृतदेह झाडांमध्ये अडकलेल्या अवस्थेत मिळून आला. एका झाडास लटकल्याने बैलगाडी चालकाचे प्राण वाचले. दोन्ही बैलांचाही मृत्यू झाला. याशिवाय शरद चांभार यांचे दोन बैल तसेच अरुण चांभार यांची बैलगाडी वाहून गेली.

*****************

जळगाव जिल्ह्य़ात भिंत कोसळून बालकाचा मृत्यू

वार्ताहर, जळगाव</p>

पारोळा तालुक्यातील लोणी (सीम) येथे मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेली िभत कोसळून बालकाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बाळू भिल यांच्या घराची भिंत धोकादायक झाली होती. रविवारी सकाळी त्यांचा दोन वर्षांचा मुलगा साई घरात खेळत असताना िभत पडली. भिंतीखाली साई दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला.