महाड औद्योगिक क्षेत्रातील घटना,  महावितरणच्या चार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अलिबाग : महाड औद्योगिक क्षेत्रातील सँडोज कारखान्यासमोर एका शेतात गुरांसाठी चारा कापणाऱ्या दोघा शेतकऱ्यांचा तुटलेल्या वीजवाहक तारांच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी महावितरणच्या शाखा अभियंत्यासह तीन लाइनमनवर औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव गजानन पवार (५०) आणि संकेत चंद्रकांत तांबे (३५ दोघेही रा. वेरखोले, बिरवाडी) अशी या घटनेत मृत पावलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. काल मंगळवारी या वीजवाहक तारा तुटून पडल्याबाबतची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. मात्र याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. आज सकाळी वेरखोले येथील संकेत तांबे आणि महादेव पवार हे दोघे शेतकरी गुरांसाठी चारा कापणीसाठी शेतात गेले असता, तुटलेल्या वीजवाहक तारांमधून उतरलेली वीज प्रवाहाच्या धक्क्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला. शेतात गेलेले दोघेही घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्या वेळी हे दोघेही एका शेतामध्ये मृत पावल्याचे दिसून आले. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आ. भरत गोगावले आणि माजी आमदार माणिक जगताप यांनीही आपल्या समर्थकांसह घटनास्थळी भेट दिली.

यानंतर महावितरणच्या एका अभियंत्यासह तिघा कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केल्याने घटनास्थळी वातावरण तंग बनले होते, मात्र पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी, पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी परिस्थिती हाताळत जमावाला शांत केले.