13 November 2019

News Flash

एव्हरेस्टवर महाराष्ट्रातील दोन गिर्यारोहकांचा मृत्यू

शिखर आरोहणानंतर त्यांना हिमदंशाचा त्रास झाल्यामुळे बचाव पथकाने त्यांना खाली आणले.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवरील यशस्वी आरोहणानंतर शिखरमाथ्यावरून उतरताना महाराष्ट्रातील दोन गिर्यारोहकांचा गुरुवारी मृत्यू झाला. ठाण्यातील अंजली कुलकर्णी (५३ वर्षे) आणि अकलूज येथील निहाल बागवान (२७) मृत्युमुखी पडले आहेत. या दोघांचे मृतदेह अजूनही आरोहणाच्या वाटेवरच असून ते परत आणण्याची बचाव मोहीम २५ मेला सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

या दोघा गिर्यारोहकांनी शिखरमाथ्यावर २३ मे रोजी सकाळी यशस्वी आरोहण केले. त्यानंतर परत येताना आठ हजार तीनशे मीटर उंचीवर असताना अंजली कुलकर्णी यांना त्रास सुरू झाला. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. या ठिकाणाला गिर्यारोहकांच्या भाषेत बाल्कनी असे संबोधले जाते. निहाल बागवान यांना सोबत असणाऱ्या लक्पा शेर्पा यांनी आधार देत साऊथ कोलपर्यंत आणले. मात्र साऊथ कोलला कॅम्पमध्ये असताना त्यांचा सायंकाळी मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंजली कुलकर्णी यांचे पतीदेखील त्यांच्यासोबत या मोहिमेत होते. शिखर आरोहणानंतर त्यांना हिमदंशाचा त्रास झाल्यामुळे बचाव पथकाने त्यांना खाली आणले. सध्या ते काठमांडू येथे आहेत.  ‘एव्हरेस्टवर आरोहणासाठी पूरक वातावरण हे केवळ २७ मेपर्यंतच आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या अवधीतच या मृतदेहांपर्यंत पोहचून ते शिखर पायथ्याला आणावे लागतील. तेथून हेलिकॉप्टरद्वारे काठमांडू येथे आणता येईल.’ असे  काठमांडू येथे असलेले कांचनजंगा मोहिमेचे नेते आणि एव्हरेस्टवीर उमेश झिरपे यांनी सांगितले.

१६ गिर्यारोहक मृत्युमुखी.. : गेल्या काही वर्षांत सर्वोच्च हिमशिखरावर आरोहणा दरम्यान विक्रम करण्याची गर्दी वाढली आहे. शिखर आरोहणासाठी वाहतूक कोंडी होण्याइतपत आरोहकांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदाच्या मोसमात ३८१ जणांना आरोहणाची परवानगी नेपाळ पर्यटन विभागाने दिली आहे. त्यामध्ये ७८ भारतीयांचा समावेश होता. आतापर्यंत या मोसमात ८ भारतीय गिर्यारोहकांसह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

First Published on May 25, 2019 2:02 am

Web Title: 2 mountaineers from maharashtra die on mount everest