यवतमाळात आज एकाच दिवशी भीषण खुनाच्या दोन घटना घडल्या असून एका घटनेत पत्नीनेच पती सेवानिवृत्त मुख्याध्यापकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा भीषण खून केल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या घटनेत कुख्यात सलमान मोहम्मद सोळंकी (२७) याचा निर्घृण खून करण्यात आला.
लोहारा परिसरातील राऊतनगरमधील खुशाल नामदेव जगतकर या ६२ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा कौटुंबिक वादातून त्याची पत्नी सुरेखा हिने शस्त्राने वार करून खून केल्याचा आरोप आहे. खुशाल जगतकरच्या शरीरावर ३५ वर जखमा असून याप्रकरणी सुरेखाशिवाय तिला मदत करणारे आणखी आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशीसाठी सुरेखासह दोघा-तिघांना ताब्यात घेतले, पण अटक केली नाही.
दुसऱ्या घटनेत आर्थिक गुन्हेगारीतील कुख्यात तारपुऱ्यातील सलमान मोहम्मद सोळंकी याचा अज्ञात आरोपींनी निर्घृण खून केला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. दोन्ही घटना रविवारी सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास घडल्या.
व्यापाऱ्याचा हॉटेलमध्ये मृतदेह
येथील हॉटेल वृषालीत पंजाबातील तरुण व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. खोलीचे दार आतून बंद होते म्हणून पोलिसांनी दार तोडून पाहिले तेव्हा हा मृतदेह दिसला. हॉटेलच्या दप्तरी या तरुणाचे नाव गिल्डा चव्हाण असे असून तो अमृतसरचा असल्याचे समजते.