करोनाचे संकट रोखण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली असताना सोलापूर ग्रामीण दलातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे दोन्ही पोलीस कर्मचारी राहत असलेला सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. सोलापुरात आतापर्यंत करोनाची बाधा झालेले १११ रूग्ण आढळून आले तरी त्यात जिल्हा ग्रामीण भागातील अवघ्या दोन रूग्णांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात काहीसे निश्चींत वातावरण असतानाच जिल्हा ग्रामीण पोलीस दलात कर्तव्य बजावणा-या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाबाधा झाल्याचे आढळून आले आहे. हे दोन्ही पोलीस कर्मचारी सोलापूर शहर पोलीस मुख्यालयाला खेटून असलेल्या जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालयात राहतात.

यातील एक पोलीस कर्मचारी मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील चिखली गावचा रहिवासी असून तो काही दिवसांपूर्वी चिखली गावी जाऊन आला होता. आता त्याला करोनाची बाधा झाल्याचे समजल्यानंतर चिखली गावातही भीतीचे वातावरण पसरले आहे. सोलापूर जिल्ह्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी तथा संचारबंदी आणि जिल्हाबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी एकूण २१० रस्त्यांपैकी १७९ रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. उर्वरीत ३१ रस्त्यांवर अहोरात्र नाकेबंदी असून सर्वत्र पोलीस यंत्रणा तैनात आहे. करोनाबाधा झालेल्या दोन्ही पोलिसांना कर्तव्यावर कोठे पाठविण्यात आले होते ? त्यांचा संपर्क कोणत्या भागात आणि कोणाशी झाला ? त्यांचा प्रवासाची पूर्वपीठिका काय, याची माहिती लगेचच समजू शकली नाही.

त्यामुळे या दोन्ही पोलिसांच्या निकटच्या संपर्कातील काहीजणांना ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित करण्यात आलेला सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा परिसर करोनाबाधित रूग्णसंख्या वाढलेल्या पाच्छा पेठ, भारतरत्न इंदिरानगर झोपडपट्टी आदी भागांच्या लगत आहे.