अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आजमितीस ५ कोटी ३ लाख युनिट्स (२ हजार ९९ मेगावॉट) वीजनिर्मिती झाली. यापैकी कारखाना वापर वगळता ३ कोटी ४७ लाख युनिट्सची महावितरण कंपनीस विक्री करण्यात आली. या विक्रीद्वारे कारखान्याला २० कोटी १६ लाख रुपयाचे महसुली उत्पन्न मिळाले आहे. या वर्षीच्या गळीत हंगामात कार्यान्वित झालेल्या ‘अशोक’चा प्रकल्प जिल्ह्यातील सर्वाधिक वीजनिर्मिती करणारा कारखाना ठरल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष माणिक शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले, ‘अशोक’चा सहवीजनिर्मिती प्रकल्प ११ नोव्हेंबर २०१३ रोजी कार्यान्वित झाला. त्यानंतर आजवरच्या १७९ दिवसांत प्रकल्पाद्वारे ५ कोटी ३ हजार युनिट्स (२ हजार ९९ मेगावॉट) वीजनिर्मिती झाली आहे. यापैकी कारखाना वापर वगळता उर्वरित ३ कोटी ४७ लाख युनिट्स (१ हजार ४४६ मेगावॉट) विजेची महावितरण कंपनीस ५ रु. ८१ पैसे प्रतियुनिटप्रमाणे विक्री करण्यात आली. महावितरणला केलेल्या वीजविक्रीतून कारखान्यास रु. २० कोटी १६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यातून प्रकल्प उभारणी कर्जाच्या रु. १० कोटी ३० लाख एवढय़ा पहिल्या हप्त्याची फेड झाली आहे.
‘अशोक’च्या वीजप्रकल्पाची सभासद, ऊस उत्पादक, यांचे बहुमोल सहकार्य आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या प्रयत्नातून यशस्वी वाटचाल सुरू आहे. फेब्रुवारीअखेरीस कर्जाच्या पहिल्या हप्त्याची फेड झाली असल्याने, दि. १ मार्चनंतरच्या वीजविक्रीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ सभासद शेतकऱ्यांना मिळेल. कारखान्याच्या वीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे पाच कोटी वीजनिर्मितीचा उच्चांक केल्याबद्दल माजी आमदार भानुदास मुरकुटे, उपाध्यक्ष माणिक शिंदे, कार्यकारी संचालक भास्कर खंडागळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.